
भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाने तिसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. आयुष म्हात्रे पुन्हा फेल गेला. त्याचा डाव फक्त 4 धावांवर आटोपला. तर आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीही दोन षटकार मारून तंबूत परतला. त्याने 20 चेंड़ूत फक्त 16 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा होता. पण त्याला काही खास करता आलं नाही. आघाडी दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला. विहान मल्होत्राने 40, वेदांत त्रिवेदीने 86 आणि राहुल कुमारने 62 धावांची खेळी केली. या तिघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 9 गडी गमवून 280 धावांपर्यंत मजल मारली. तसेच विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं.
विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अलेक्स टर्नर आणि टॉम होगन यांनी त्यातल्या त्यात धावा केल्या. अलेक्स टर्नरने , तर टॉम होगनने 28 धावा केल्या. कर्णधार विल मलाज्झुक फक्त 15 धावा करून तंबूत परतला. या व्यतिरिक्त इतर फलंदाज एकेरी धावांवर तंबूत परतले. दोन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने 28.3 षटकात सर्व गडी गमवून कशी बशी 113 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून खिलान पटेलने 7.3 षटकात 26 धावा देत 4 गडी बाद केले. तर उद्धव मोहनने 5 षचटकात 26 धावा देत 3 गडी टिपले. तर कनिष्क चौहानने 2 गडी बाद केला. या तिघांनी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद केला. भारताने हा सामना 167 धावांनी जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियाला वनडे व्हाईट वॉश दिला. या विजयासह भारताने मालिका 3-0 ने खिशात घातली.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, हरवंश पंगालिया (विकेटकीपर), कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, उद्धव मोहन.
ऑस्ट्रेलिया अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): अॅलेक्स टर्नर, अॅलेक्स ली यंग (विकेटकीपर), स्टीव्हन होगन, विल मलाज्झुक (कर्णधार), टॉम होगन, जेडेन ड्रेपर, आर्यन शर्मा, बेन गॉर्डन, केसी बार्टन, चार्ल्स लॅचमुंड, विल बायरम.