बुमराह Vs कैफ यांच्यात सोशल मीडियावर रंगलं शाब्दिक युद्ध, आता जसप्रीतच्या उत्तरावर पुन्हा प्रतिप्रश्न
आशिया कप 2025 स्पर्धा सुरु असताना भारतीय खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि जसप्रीत बुमराह यांच्यात पोस्ट वॉर सुरु झालं आहे. कैफच्या पोस्टवर बुमराहने नाराजी व्यक्त केली होती. आता त्यावर कैफने उत्तर दिलं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीची धार कमी झाल्याचं पाहायला मिळालं. या स्पर्धेत जसप्रीत बुमराह तितका प्रभावी दिसला नाही. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफन जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर खूश नाही. बुमराहच्या गोलंदाजीचं विश्लेषण करताना मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने बुमराहकडून गोलंदाजी करवून घेत आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जसप्रीत बुमराह या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळला आहे. त्यात एका सामन्यात आराम दिला होता. तर पहिल्या सामन्यात बुमराहने फक्त 3 षटके टाकली होती. इतकंच काय तर जसप्रीत या स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना दिसला. मोहम्मद कैफने शेअर केलेली पोस्ट काही जसप्रीत बुमराहला आवडली नाही. त्यामुळे त्याने पोस्टला उत्तर देत ती चुकीची असल्याचं म्हंटलं आहे. बुमराहच्या उत्तरातून तो नाराज असल्याचं स्पष्ट दिसून आलं. ‘पहिल्यांदा चुकीचा आणि आताही चुकीचा आहे.’, अशी पोस्ट कैफच्या पोस्टवर केली होती.
जसप्रीत बुमराहच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर मोहम्मद कैफ बॅकफूटवर आला आहे. त्याने बुमराहच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, ‘कृपया एक शुभचिंतक आणि चाहत्याची क्रिकेट टीका समजा. तुम्ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे मॅचविनर आहात आणि मला माहिती आहे की भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर आपलं सर्वोत्तम देण्यासाठी काय करावं लागतं.’ आता यावर जसप्रीत बुमराहकडून काय उत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Please take this as a cricketing observation from a well-wisher and an admirer. You are Indian cricket’s biggest match-winner and I know what it takes to give it all when on field wearing India colours. https://t.co/FqJh7NgRb9
— Mohammad Kaif (@MohammadKaif) September 26, 2025
मोहम्मद कैफने सोशल मिडियावर पोस्ट करत बुमराहच्या वर्कलोड आणि गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कैफने सांगितलं होतं की, बुमराह आता सामान्यतः सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो, दुखापत टाळण्यासाठी डेथ ओव्हर्स टाळतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बुमराह सामान्यतः क्रमांक 1, 13, 17 आणि 19 ओव्हर्स टाकत असे. तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली त्याने आशिया कपमध्ये फक्त तीन ओव्हर्स टाकल्याचे त्याने नमूद केले. उर्वरित 14 षटकांमध्ये फक्त एक षटक टाकणं फलंदाजांसाठी मोठा दिला आहे. यामुळे विश्वचषकात मजबूत संघाविरुद्ध भारताला त्रास होऊ शकतो.
