Asia Cup Final, Ind vs Pak : भारताला अंतिम सामन्यात या तीन चुका दुरुस्त कराव्याच लागणार, नाही तर….
आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ पुन्हा भिडणार आहे. तिसऱ्यांदा दोन्ही संघांचा आमनासामना होणार आहे. पण यावेळचा सामना हा जेतेपदासाठी असणार आहे. त्यामुळे भारताला अंतिम सामन्यात तीन चुका सुधारणं आवश्यक आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. सुपर 4 फेरीतील भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा फक्त औपचारिक सामना आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांनी अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंतिम सामन्याकडे लागून आहेत. कारण भारत आणि पाकिस्तान हे संघ तिसऱ्यांदा भिडणार आहे. भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत तीन वेळ धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा हाच कित्ता गिरवून जेतेपदावर नाव कोरण्याचं स्वप्न आहे. भारताचं अंतिम फेरीत पाकिस्तानच्या तुलनेत वजन जास्त आहे. पण असं असलं तरी भारतीय संघाला ताक फुंकून पिण्याची गरज आहे. कारण क्रिकेट आणि खासकरून खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अशा स्थितीत भारताला अंतिम फेरीत स्पर्धेत केलेल्या तीन चुका दुरूस्त करूनच उतरावं लागणार आहे. काय ते जाणून घ्या
या तीन चुका दुरुस्त करणं आवश्यक
सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या काही सामन्यात त्याची बॅट शांत आहे. कर्णधार असल्याने त्याची संघातील जागा पक्की आहे. अन्यथा सूर्यकुमार यादव बेंचवर बसलेला दिसला असता. पाकिस्तानविरुद्धच्या मागच्या सामन्यात सूर्यकुमारने खातंही खोललं नव्हतं. तर आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात फक्त 59 धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चालावी अशी प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत.
आशिया कप स्पर्धेत भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर झेल सोडण्याची स्पर्धा लागली होती. त्यामुळे भारताला मोठं आव्हान पार करावं लागलं. दुसरीकडे, या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 12 झेल सोडले आहेत. यापैकी 8 झेल तर सुपर 4 फेरीच्या दोन सामन्यात सोडले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करणं आवश्यक आहे. सरावादरम्यान भारतीय खेळाडू झेल घेण्याचा सराव करत आहेत.
भारताने आशिया कप स्पर्धेत बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच बदल केल्याचं पाहायला मिळाले. बांगलादेशविरुद्ध शिवम दुबे तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता. इतकंच काय तर संजू सॅमसनला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. यापूर्वी ओमानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार वगळता इतर खेळाडूंनी फलंदाजी केली. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रयोग अंतिम सामन्यात परवडणारे नाहीत.
