टीम इंडियाच्या नव्या कोचबाबत जय शाह यांच्याकडून अपडेट, या दौऱ्यापासून देणार साथ

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. असं असताना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नव्या प्रशिक्षकाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

टीम इंडियाच्या नव्या कोचबाबत जय शाह यांच्याकडून अपडेट, या दौऱ्यापासून देणार साथ
| Updated on: Jul 01, 2024 | 7:31 PM

टीम इंडियासाठी राहुल द्रविड याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ खूपच प्रभावी ठरला. अपयशाच्या पायऱ्या चढत असताना शेवटच्या टप्प्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं. आता राहुल द्रविड याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकून राहुल द्रविडला सेंडऑफ दिला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नव्या प्रशिक्षकापदी मोठं अपडेट दिलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया नव्या प्रशिक्षकासह खेळताना दिसेल. म्हणजेच नव्या प्रशिक्षकाची घोषणा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. क्रिकेट सल्लाकार समितीने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी दोन दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहे. त्यापैकी एकाची निवड केली जाईल, असं जय शाह यांनी सांगितलं. “प्रशिक्षक आणइ निवडकर्ता या दोघांची नियुक्ती लवकर केली जाईल, सीएसीने या दोन्ही नावांची निवड केली आहे.मुंबईत पोहोचल्यानंतर जो काही निर्णय असेल तो घेतला जाईल. त्यानुसार आम्ही काम करू. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. नवा कोच श्रीलंका मालिकेपासून असणार आहे.”

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीपुढे मुख्य प्रशिक्षकासाठी गौतम गंभीर आणि डब्ल्यूवी रमण यांनी मुलाखत दिली आहे. दोघांनी व्हिडीओ कॉलद्वारे मुलाखतीला हजेरी लावली होती.नव्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळ जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. भारतीय संघ 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान तीन टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टी20 संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. याबाबत जय शाह यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “कर्णधारपदाचा निर्णय निवडकर्ते करतील. आम्ही त्यानंतर त्याची घोषणा करू.”

जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अपडेट देत सांगितलं की, “मला वाटतं की सर्वच जेतेपद जिंकावेत. आमच्याकडे क्रिकेटपटूंची मोठी फळी आहे. या टीममधील फक्त तीनच खेळाडू झिम्बाब्वेला जात आहेत. गरज पडली तर आम्ही तीन संघ उतरू शकतो. ज्या पद्धतीने टीम पुढे जात आहे, त्यावरुन आमचं ध्येय हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं आहे. तिथेही हीच टीम खेळेल. वरीष्ठ खेळाडू असतील.”