कुणी कचऱ्याची गाडी चालवली, तर कुणी सेक्युरिटी गार्ड बनला… विनोद कांबळीच नव्हे, हे 7 क्रिकेटपटू बनले रावाचे रंक

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात दिसल्याने सर्वांना धक्का बसला आहे. एकट्या कांबळीवरच नव्हे, तर जनार्दन नवले, बॅरी पोलॉक, अ‍ॅडम होलियोक यांसारख्या 7 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही निवृत्तीनंतर गरिबी, आजारपण आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. एकेकाळी मैदान गाजवणारे हे खेळाडू कसे रावाचे रंक बनले, याचा हृदयद्रावक आढावा या लेखात घेतला आहे.

कुणी कचऱ्याची गाडी चालवली, तर कुणी सेक्युरिटी गार्ड बनला... विनोद कांबळीच नव्हे, हे 7 क्रिकेटपटू बनले रावाचे रंक
vinod kambli
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 5:05 PM

प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विनोद कांबळीने निदान सेंटर फॉर एल्डरली केअरमधून हा व्हिडीओ शेअर केला आहे. कांबळीने चक्क वृद्धाश्रमातून व्हिडीओ शेअर केल्याने सर्वांच्या मनात कालवाकालव झाली आहे. एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाला नीट बोलताही येत नसल्याचं पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कांबळी गेल्या काही महिन्यापासून आजारी आहे. आजाराचा खर्च परवडत नसल्याने त्याला वृद्धाश्रमात आणण्यात आलं आहे. त्याची ही अवस्था पाहून अनेकजण हळहळत आहेत. एकटा विनोद कांबळीच नव्हे तर जगभरातील सात क्रिकेटपटूंवर रावाचा रंक बनण्याची वेळ आलेली आहे. कोण आहेत हे क्रिकेटपटू? त्याचाच घेतलेला हा आढावा.

जनार्दन नवले (भारत)

जनार्दन नवले हे भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिले विकेटकीपर फलंदाज होते. 1932मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर भारतासाठी टेस्ट क्रिकेटसाठी खेळणारे ते पहिले खेळाडू होते. त्याकाळी हौस किंवा सन्मान म्हणून क्रिकेट खेळलं जायचं. आजच्या सारखे करोडोचे आयपीएल कॉन्ट्रॅक्ट वा ब्रँडची डील वगैरे केली जात नव्हती. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर नवले यांच्याकडे काहीच कामधंदा उरला नव्हता. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी भारताच्या या पहिल्या टेस्ट ओपनरला पुण्याच्या एका साखर कारखान्यात सेक्युरिटी गार्ड म्हणून 12 तास काम करावं लागत होतं. शेवटच्या काळात तर पुणे-मुंबई हायवेवर एका झोपडीत ते राहत होते. नंतर पुण्यातील एका छोट्या खोलीच्या फ्लॅटमध्ये ते राहायला गेले. 7 सप्टेंबर 1979 मध्ये पुण्यातच त्यांनी अंतिम श्वास घेतला.

बॅरी पोलॉक (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज बॅरी पोलॉक यांची तुलना तर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची. त्यांची कसोटीतील सरासरी 60.97 एवढी होती. वर्णभेदामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात आली. त्यामुळे यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या करिअरला ब्रेक लागला. त्यानंतर त्यांनी त्यांची सर्व कमाई रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमध्ये टाकली. पण मंदीमुळे त्यांचं दिवाळं निघालं. म्हातारपणात त्यांना पार्किसन आणि पोटाचा कॅन्सर झाला. त्यामुळे महागडा उपचाराचा खर्च भागवण्यासाठी त्यांना शेवटच्या काळात साऊथ आफ्रिका बोर्ड आणि आयपीएल संघासमोर मदत मागावी लागली.

अ‍ॅडम होलियोक (इंग्लंड)

अ‍ॅडम होलियोक हे इंग्लंडच्या संघाचे माजी कर्णधार आणि आक्रमक ऑलराऊंडर होते. त्यांनी आपल्या नेतृत्वात 1997ची शारजाह ट्रॉफी जिंकली होती. क्रिकेटनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी बिझनेसमध्ये लक्ष घातलं. पण 2008च्या जागतिक मंदीत त्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. 2011मध्ये कोर्टाने त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित केलं. आर्थिक तंगीमुळे अ‍ॅडम होलियाक यांच्यावर एकदा तर भयंकर वेळ आली होती. घराचं भाडं भरण्यासाठी आणि रेशन मिळवण्यासाठी त्यांना मजबुरीने एमएमए (मिक्स्ड मार्शल आर्ट्स) च्या खतरनाक लोखंडी पिंजऱ्यात उतरावं लागलं. रिंगमध्ये त्यांना तरबेज फायटर्सच्या लााथाबुक्क्या खाव्या लागल्या.

मॅथ्यू सिंक्लेयर (न्यूझीलंड)

मॅथ्यू सिंक्लेयर हे न्यूझीलंडचे स्फोटक फलंदाज होते. त्यांनी टेस्टमध्ये पदार्पणातच वेस्ट इंडिजच्या विरोधात ऐतिहासिक 214 धावा ठोकल्या होत्या. पण 2013मध्ये त्यांचं आंतरराष्ट्रीय करिअर अचानक थांबलं. बालपण आणि तारुण्यात केवळ क्रिकेटच खेळत असल्याने त्यांच्याकडे कोणतीच डिग्री नव्हती. त्यामुळे त्यांना कोणत्याच कंपनीने नोकरी दिली नाही. त्यातच त्यांच्याकडे जमवलेला सर्व पैसा संपला. त्यामुळे त्यांना न्यूझीलंड सरकारच्या बेरोजगारी भत्त्याच्या रांगेत उभं राहावं लागलं. मुलांच्या शाळेची फि भरण्यासाठी त्यांनी सुपरमार्केटमध्ये सेल्समन आणि रिअल इस्टेट एजंट म्हणूनही काम केलं.

अरशद खान (पाकिस्तान)

अरशद खान हा पाकिस्तानातील सव्वा सहाफूट उंच दिग्गज ऑफ स्पिनर होता. त्याने 2005मध्ये भारत दौऱ्यावर सचिन, द्रविड आणि सहवाग सारख्या दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीने जेरीस आणले होते. त्याने पाकिस्तानसाठी 9 कसोटी आणि 58 वनडे सामने खेळले. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेलं दुर्लक्ष आणि राजकारणामुळे त्याला संन्यास घ्यावा लागला. त्यानंतर त्याला कोचिंग कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि सन्मानजनक पेंशनही मिळाली नाही. त्यामुळे त्याला घर चालवणं कठिण झालं. परिणामी त्याला सर्व काही विकून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात जावं लागलं. सिडनीत भयंकर ऊन आणि कडाक्याच्या थंडीत 12-12 तास टॅक्सी आणि कॅब चालवून त्याला उदरनिर्वाह करावा लागला.

पॅट्रीक पीटरसन (वेस्टइंडिज)

1980च्या दशकात वेस्ट इंडिजच्या पॅट्रिक पीटरसनने आपल्याकडे जगाचं लक्ष वेधलं होतं. मार्शलनंतर त्याला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज मानलं जात होतं. ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने तो गोलंदाजी करत भल्याभल्या फलंदाजांची झोप उडवत होता. पण क्रिकेटमधून बाहेर पडल्यावर तो आयुष्यभर मानसिक आजाराचा शिकार झाला. त्यानंतर त्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. जमैकाच्या झोपडपट्टीत राहण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याच्याकडे विजेचं बिल भरण्यासाठी आणि दोनवेळच्या जेवणासाठीही पैसे नसायचे. एकदा अचानक एका भारतीय क्रीडा पत्रकाराने त्याचा शोध घेतला आणि क्राऊड फंडिंग करून त्याला आर्थिक चणचणीतून बाहेर काढलं.

क्रिस केर्न्स (न्यूझीलंड)

क्रिस केर्न्स केवळ न्यूझीलंडचेच नव्हे तर 90च्या दशकातील त्यावेळचे जगातील सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर होते. केर्न्सने 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट आणि 3000 हून अधिक धावा ठोकल्या होत्या. वर्ष 2013मध्ये त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लागला. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कायदेशीर लढाई लढली आणि वकिलांवर संपूर्ण पैसा खर्च केला. एकेकाळी बिजनेस क्लासमधून प्रवास करणारा हा सुपरस्टार खेळाडून ऑकलंडच्या रस्त्यावर महापालिकेचे बस शेल्टर धूत असताना दिसला. 100 डॉलरसाठी कचऱ्याचा ट्रक चालवताना दिसला.

विनोद कांबळी (भारत)

विनोद कांबळी हा भारतातील अत्यंत प्रतिभावंत डावखुरा फलंदाज होता. त्याने सचिनसोबत 664 धावांची विक्रमी भागिदीरी केली होती. त्याने केवळ 14 सामन्यात 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. पण शिस्तीचा अभाव, रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या पार्ट्या, चैनीचं आयुष्य जगणं आणि चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यामुळे त्याचं चांगलं करिअर वाया गेलं. त्यानंतर त्याला गंभीर आजारांनी ग्रासलं. महागड्या उपचारामुळे त्याच्याकडील उरलासुरला पैसा संपला. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर त्याची गुजराण सुरू आहे. मात्र, आता तो थेट वृद्धाश्रमात दिसल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us