
मुंबई क्रिकेट असोसिएशनने शनिवारी वानखेडे स्टेडियममध्ये ‘एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे’ उद्घाटन केलं. संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शरद पवार यांचे पुतळे उभारले आहेत. शरद पवार व सुनील गावस्कर यांचा हुबेहूब आणि सुंदर पुतळा साकरण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार, अध्यक्ष अजिंक्य नाईक, मान्यवर, दिग्गज क्रिकेटपटू, प्रशासक आणि मुंबई क्रिकेट क्षेत्रातील सदस्य उपस्थित होते. मुंबई आणि भारतासाठी क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या कथा, कामगिरी आणि संस्मरणीय क्षण या संग्रहालयात जतन केले जाणार आहे. हे संग्रहालय 22 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन बुकिंगद्वारे जनतेसाठी खुले होईल. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सांगितलं की, ‘या संग्रहालयाला माझं नाव दिलं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुंबईचा क्रिकेट प्रवास आणि इतिहास यातून नव्या पिढीला पाहता येईल. हे संग्रहालय येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.’
दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी या संग्रहालयाचं कौतुक केलं. ‘मी नेहमीच स्वतःला क्रिकेट इतिहासाचा विद्यार्थी मानत आलो आहे. आमच्या काळात क्रिकेटचे व्हिडिओ नव्हते, फक्त पुस्तके आणि मासिके होती. आम्ही वाचून शिकायचो, आत्मचरित्रांमधून शिकायचो आणि लिखित शब्दांमधून ज्ञान मिळवायचो. म्हणूनच मला हे संग्रहालय पाहून आनंद होत आहे.’ एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले की, ‘मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की शरद पवार आणि सुनील गावस्कर या दोन महान व्यक्तिमत्त्वांचे पुतळे आता भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून उभे आहेत.’
मंत्री आशिष शेलार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ‘एमसीएसाठी त्याचसोबत बीसीसीआयला ज्यांनी सर्व काही दिलं त्यांचं नाव द्यायचं ठरलं. मला आनंद आहे की तुमच्या नावाच्या संग्रहलायचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. आज वानखेडेत संग्रहालय झालं. मी लॉर्ड्सवर गेलो होतो आणि तिथलं संग्राहलय पाहिलं आहे. त्यात अनेक आठवणी जपल्या आहेत. केलसरकर यांचा उल्लेख तिथे आहे. तसेच कार्य आपल्याकडे पण झाले पाहिजे.’, असं मंत्री आशिष शेलार म्हणाले.
क्रिकेटपटू शार्दुल ठाकुर म्हणाला की, शरद पवार म्युझियम आज तयार झाले आहे, येणाऱ्या क्रिकेटर्ससाठी हे खूप महत्वाचे आहे. तरुणांना याची मदत होईल रणजीने अनेक मोठे खेळाडू दिलेत. आपण तिथे तयार होतो. अनेक लोक या ठिकाणी मुंबईतून खेळतात मुंबईतून अनेक क्रिकेटपटू हे घडलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा जपण्याचा काम या ठिकाणी केला जाणार आहे.