ENG vs IND : बुमराह कोणते 3 सामने खेळणार? हेड कोच गौतम गंभीर म्हणाला..

IND vs ENG Gautam Gambhir Shubman Gill Press Conference : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याआधी मुंबईत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार आणि हेड कोच यांची पत्रकार परिषद पार पडली. गंभीरने या दरम्यान बुमराहबाबत मोठी अपडेट दिली.

ENG vs IND : बुमराह कोणते 3 सामने खेळणार? हेड कोच गौतम गंभीर म्हणाला..
Gautam Gambhir On jasprit Bumrah IND vs ENG
Image Credit source: Tv9 and Social Media
| Updated on: Jun 05, 2025 | 8:00 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत अनेकदा तिन्ही फॉर्मेटमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-2 पर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. या 18 व्या हंगामानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आज 5 जून रोजी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात नवनियुक्त कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद पार पडली. गंभीरने या दरम्यान बुमराह कोणते 3 सामने खेळणार? याबाबत प्रतिक्रिया दिली.

टीम इंडिया 20 जून ते 4 ऑगस्टदरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. मात्र बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं बीसीसीआयला सांगितलं होतं. त्यामुळे बुमराह कोणते 3 सामने खेळणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत गंभीरला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. यावर गंभीरने काय म्हटलं? जाणून घेऊयात.

गौतम गंभीर काय म्हणाला?

“जसप्रीत बुमराह कोणते 3 कसोटी सामने खेळणार? हे आम्ही ठरवलेलं नाही. बुमराह कोणते 3 सामने खेळणार हे निकालावर आणि मालिकेतील टीम इंडियाच्या स्थितीवर अवलंबून असेल”, असं गंभीरने स्पष्ट केलं.

बॅटिंग ऑर्डरबाबत शुबमनची प्रतिक्रिया

“मला कर्णधारपदाची जबाबदारी मिळालीय, हे समजल्यानंतर मी फार आनंदी होतो. नेतृत्व करणं ही मोठी जबाबदारी आहे. मी त्यासाठी तयार आहे. आम्ही लवकरच बॅटिंग ऑर्डरबाबत निर्णय घेऊ. आमच्याकडे बॅटिंग ऑर्डर ठरवण्यासाठी अजूनही वेळ आहे”, असं म्हणत शुबमन गिलने कर्णधार झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आणि बॅटिंग ऑर्डरवर भाष्य केलं.

टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), शोएब बशीर, जॅकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.