
इंग्लंडने मेन्स टीम इंडियावर लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यामुळे आता शुबमनसेनेला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तर त्याआधी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला कोणत्याही स्थितीत चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड वूमन्स टीमसाठी करो या मरो स्थिती उद्भवली आहे. वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात 5 सामन्यांची टी 20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकल्यानंतर वनडे सीरिजमध्ये विजयी सलामी दिली.
महिला ब्रिगेडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लडवर 4 विकेट्सने मात केली. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 19 जुलैला खेळवण्यात येणार आहे. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस होईल. हरमनप्रीत कौर भारताचं तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
इंग्लंडने आधीच टी 20I मालिका गमावली आहे. त्यात आता इंग्लंडसमोर एकदिवसीय मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. इंग्लंडला मालिकेत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थिती भारताला पराभूत करावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताची महिला ब्रिगेड सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने दुसरा सामना जिंकला तर हा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दौरा ठरेल. तसेच इंग्लंडने दुसरा सामना जिंकला तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजेता ठरेल. मात्र त्याआधी दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं सध्या लक्ष आहे.
महिला ब्रिगेडकडे दुसरा सामना जिंकून लॉर्ड्समध्ये मेन्स टीम इंडियाच्या पराभवाची परतफेड करण्याचीही संधी आहे. त्यामुळे दुसरा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि निर्णायक असा आहे.
दरम्यान दुसऱ्या सामन्यासाठी वूमन्स टीम इंडियात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. साधारणपणे विजयी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र त्यानंतरही बदल केला जाणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.