Explainer : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात मुशफिकुर रहिमला बाद देण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या

क्रिकेटविश्वात अनेक बदल झाले असून नव्या नियमांची भर झाली आहे. तर काही खेळाडूंना अजून आयसीसीचे नियमच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट बाद दिलं गेलं. त्यानंतर आता बांगलादेशच्या मुशफिकुर रहिमला त्याच्या एका चुकीमुळे बाद देण्यात आलं. यासाठी आयसीसीचा एक नियम आहे. हा नियम नेमका काय सांगतो ते जाणून घेऊयात..

Explainer : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात मुशफिकुर रहिमला बाद देण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या
Explainer : मुशफिकुर रहिमला नको तो शहाणपणा नडला! आयसीसीच्या नियमात असा अडकला आणि बाद झाला
| Updated on: Dec 07, 2023 | 4:16 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी साखळी फेरीचे कसोटी सामने सुरु आहेत. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पहिला कसोटी सामना जिंकत बांगलादेशने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ बरोबरीसाठी धडपडत आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 15 खेळाडू बाद होत तंबूत परतले. पण चर्चा रंगली ती मुशफिकुरच्या आऊट होण्याची..झालंही तसंच कारण मुशफिकुर रहिम अशा पद्धतीने बाद होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. बांगलादेशकडून अशा पद्धतीने बाद होणारा मुशफिकुर रहिम हा पहिलाच फलंदाज आहे. न्यूझीलंडकडून 41 वं षटक वेगवान गोलंदाज कायल जेमिसन टाकत होता. त्याच्या गोलंदाजीच्या चौथ्या चेंडूवर रहीमने डिफेंसिव्ह शॉट खेळला. चेंडू जागेवरच रोखण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण झालं की चेंडू खेळपट्टीवर आदळताच उसळी घेतली. त्यामुळे रहिमने चेंडू विकेटवर येईल या भीतीने हाताने दूर ढकलला. मग काय काय नको तेच झालं आणि त्याला बाद होत तंबूत परतावं. पण अशा पद्धतीने बाद देण्याचं कारण काय? जाणून घ्या

मुशफिकुरने हाताने चेंडू अडवल्यानंतर मैदानातील पंचांनी थेट तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. मुशफिकुरने जाणीवपूर्वक चेंडू अडवल्याचं दिसून आलं. तिसऱ्या पंचांनी खात्री पटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मुशफिकुर रहिमला हँडलिंग द बॉल/ ऑब्सट्रक्टिंग द फील्ड या नियमांतर्गत बाद देण्यात आलं. कसोटी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1951 मध्ये इंग्लंडचा लेन हटन अशा पद्धतीने बाद झाला होता. वनडे क्रिकेटमध्ये 8 आणि टी20 क्रिकेटमध्ये दोन फलंदाजांना अशा पद्धतीने बाद देण्यात आलं आहे.

एमसीसीच्या नियमानुसार 37.1.1 नुसार कोणताही फलंदाज चेंडू खेळल्यानंतर जाणीवपूर्वक विरोधी संघातील क्षेत्ररक्षकांच्या कामात अडथळा आणतो किंवा काही अपशब्द वापरून लक्ष विचलीत करतो तेव्हा त्याला ऑब्सट्रक्टिंग द फील्ड अंतर्गत बाद दिलं जातं. त्याचबरोबर खेळाडूने जाणीवपूर्वक चेंडू अडवला किंवा बॅट न धरलेल्या हाताने मारला. तर त्याला या नियमांतर्गत अंतर्गत बाद दिलं जाईल.

बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण बांगलादेशचा संपूर्ण संघ 172 धावांवर बाद झाला. तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर मिशफिकुर रहिम मैदानात उतरला होता. त्याने 83 चेंडूत 35 धावांची खेळी केली. पण दुर्दैवीपणे बाद होण्याची वेळ त्याच्यावर आली. दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबला आहे. पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंड पाच गडी बाद 55 धावा केल्या आहेत. डेरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स ही जोडी मैदानात आहे.