
सामनाधिकार अँडी पायक्रॉफ्टचं भूत पाकिस्तान संघ आणि पीसीबीच्या मानगुटीवर बसलं असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. कारण आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांचा मुद्दा उचलत नाटकी सुरु केली होती. पुढच्या सामन्यात सामनाधिकारी असतील तर खेळणार नाही वगैरे वगैरे.. यासाठी पाकिस्ताने एकदा नाही तर दोनदा आयसीसीला पत्र लिहिलं. पण दोन्ही वेळेस त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. यामुळे पाकिस्तान संघ आणि पीसीबीची लाज गेली. त्यामुळे सामना खेळणार नाही असा पवित्रा घेतला. पण नंतर पुन्हा एकदा सामना खेळण्याची तयारी दाखवली. हा सामना आता एक तास उशिराने सुरु झाला आहे. पण या संपूर्ण घडामोडींमध्ये पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांना खलनायक दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तसं झालं नाही. अँडी पायक्रॉफ्ट यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंवर भारी पडले आहेत. त्यामुळे ते नेमके कोण आहेत? यापूर्वी कसं काय केलं होतं? ते सर्व जाणून घ्या.
अँडी पायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वेसाठी तीन कसोटी आणि 20 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी या काळात एकूण 447 धावा केल्या. त्यांचं क्रिकेट करिअर काही खास राहिलं नाही. पण पायक्रॉफ्ट 2009 पासून आयसीसीच्या एलीट पॅनेलचा भाग झाले. यावेळी त्याने 103 कसोटी, 248 वनडे आणि 183 टी20 सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली. इतका अनुभव गाठिशी असल्याने आयसीसीतील दिग्गज अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळेत त्यांना आशिया कप 2025 स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील क्रिकेट वैर जुनंच आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने अनेकदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यात अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर कारवाई केली आहे. अँडीने सईद अजमल आणि मोहम्मद हाफीज यांच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांची शैली अवैध घोषित केली होती. त्यामुळे पाकिस्तान आणि अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. केपटाउन टेस्ट 2018 मध्ये अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी होते. तेव्हा त्यांनी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांना चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी दोषी धरत कारवाई केली होती.