
अभिनेत्री अनुष्का शर्माची एक मैत्रीण सध्या सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. अनुष्काची ही मैत्रीण कोण आहे, ती काय करते याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी फारच उत्सुक आहेत. इतकंच नव्हे तर तिला ओळखणाऱ्या लोकांच्या यादीत अनेक मोठी नावं आहेत. अर्थातच ती अनुष्काची मैत्रीण असल्याने विराट कोहली तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. पण विराटशिवाय क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल, क्रिकेटर युजवेंद्र चहल हेसुद्धा तिचे फॉलोअर्स आहेत. महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीचंही नाव फॉलोअर्सच्या यादीत आहे. त्यामुळे अनुष्काची ही मैत्रीण नेमकी आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.
अनुष्काच्या या मैत्रिणीचं नाव मालविका नायर आहे. ती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या आयपीएलच्या क्वालिफायर सामनादरम्यान कॅमेरासमोर दिसली होती. जेव्हा आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्ध क्लालिफायर 1 जिंकून आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद साजरा केला, तेव्हा मालविका नायरसुद्धा त्यात दिसली होती.
Got it- her name is Malavika Nayak and her husband is Nikhil Sosale who has a Diageo background (that owns RCB) and also now he manages all brand and publicity for RCB. pic.twitter.com/RFumcrUUxH
— KaustubhP (@causticcos) May 30, 2025
मालविका आणि अनुष्का या एकमेकांच्या जुन्या मैत्रिणी आहेत. फक्त क्लालिफायर 1 च्या सामन्यातच नाही तर त्याआधीही या दोघांना स्टेडियममध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. जेव्हा आरसीबी विरुद्ध एलएसजीचा सामना रंगला, तेव्हासुद्धा मालविका स्टेडियममध्ये उपस्थित होती. मालविकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनमधून एमबीएची पदवी संपादित केली आहे. सध्या ती इनॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते. मालविकाचं लग्न आरसीबीचे महसूल आणि विपणन प्रमुख (रेवेन्यू अँड मार्केटिंग हेड) निखिल सोसाले यांच्याशी झालंय. अनुष्का, विराट, मालविका आणि निखिल यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. त्यामुळे या चौघांमध्ये खूप चांगली मैत्री असल्याचं स्पष्ट होतंय.
दरम्यान विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनुष्कासोबत तो वेळ घालवताना दिसून आला. या दोघांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनुष्काने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला आहे. तिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र या चित्रपटाविषयी सध्या कोणतीच अपडेट समोर आली नाही. यामध्ये अनुष्का क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे.