वैभव सूर्यवंशीच्या जवळ बसून मोबाईल वापरणारी व्यक्ती कोण? Video मुळे नव्या वादाला फोडणी
आयपीएल 2026 स्पर्धेतील 16वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 18व्या षटकात जिंकला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. पण या सामन्यातील एका व्हिडीओमुळे सध्या वादाला फोडणी मिळाली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. आव्हान गाठताना वैभव सूर्यवंशीने आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. त्याच्या या झंझावाती खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा विजय सोपा झाला. आरसीबीने दिलेलं लक्ष्य राजस्थान रॉयल्सने 18व्या षटकात पूर्ण केलं. पण या सामन्यातील एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये गेला. यावेळी वैभव सूर्यवंशीच्या बाजूला उभा राहून राजस्थान रॉयल्सचा अधिकारी मोबाईल ऑपरेट करत होता. त्या व्हिडीओमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
काय झालं सामन्यादरम्यान?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या बाजूला राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून एक व्यक्ती आहे. सदर व्यक्ती कोचिंग स्टाफमधील असल्याची दिसत आहे. तसेच हातात मोबाईल असून तो ऑपरेट करत आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलच्या नियमांनुसार, सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूला, प्रशिक्षकाला किंवा इतर सपोर्ट स्टाफ सदस्याला मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.
कोण आहे सदर व्यक्ती?
मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव रवींद्र सिंग भिंदर आहे. भारतीय क्रिकेटमध्ये रोमी भिंदर याने नावाने ओळख आहे. रोमी भिंदर हे राजस्थान रॉयल्सचा टीम मॅनेजर असून कधीकधी खेळाडूंना सरावासाठी मदत करतात. पण सामन्यादरम्यान मोबाईल वापरून त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं आहे. मैदानावर किंवा डगआऊटमध्ये अशी उपकरणे वापरू शकत नाही, असा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचा नियम आहे. त्यामुळे या नियमांचं सर्रास उल्लंघ झाल्याचं दिसत आहे. आता बीसीसीआय रॉयल्सचे व्यवस्थापक भिंदर यांच्यावर कारवाई करणार का? याकडे लक्ष लागून आहे.