
आयपीएल 2024 स्पर्धेत एकूण 10 संघ आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण 14 सामने खेळणार आहे. म्हणजेच एक संघ साखळी फेरीत 9 संघांना भिडणार आहे. त्यानंतर पाच सामन्यात पाच संघ रिपीट होतील. पण रिपीट होणारे पाच संघ निवडले तरी कसे जातात असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यासारखे दिग्गज संघ साखळी फेरीत एकदाच भिडणार आहे. हे गणित ठरतं तरी कसं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण हे दोन दिग्गज संघ 14 एप्रिलला भिडतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर प्लेऑफ किंवा अंतिम फेरीत हे संघ आमनेसामने येऊ शकतात. आयपीएल स्पर्धेत 10 संघ 2022 मध्ये आले. त्या आधी एकूण 8 संघ होते आणि प्रत्येक संघ दोनदा एकमेकांसमोर उभा ठाकत होता. मात्र आता फॉर्मेट बदलला असून नवीन पद्धतीने साखळी फेरीचे सामने खेळवले जातात.
2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघ सामील झाले. त्यानंतर पाच पाच संघांचे दोन गट पाडले गेले. आयपीएल 2023 आणि 2024 स्पर्धेतही हे दोन गट कायम आहेत. त्यामुळे आपल्या गटातील संघासोबत प्रत्येकी दोन सामने खेळेल. म्हणजेच आठ सामने होतील. त्यानंतर उर्वरित सहा सामन्यासाठी दुसऱ्या गटातील पाच संघांशी प्रत्येकी एक सामना होईल. तर एक सामना ड्रॉ आधारे दुसऱ्या गटातील एका संघासोबत डबल खेळला जाईल.
मुंबई इंडियन्स अ गटात असून यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत. चेन्नई सुपर किंग्स ब गटात असून यात गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आहेत. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातही साखळी फेरीत एकच सामना होणार आहे. आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ दोनदा भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादशी दोनदा भिडणार आहे.