
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण या स्पर्धेत जसप्रीत बुमराह नसल्याने अनेकांना काहीतरी उणीव असल्याचं वाटत आहे. जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया हे समीकरणच काही जणांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंनी निराशा व्यक्त केली आहे. आता बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जो खेळाडू संघातच नाही त्याच्याबाबत चर्चा तरी कशाला करायची. तुमच्या खिशात 100 असतील तर खूश व्हा, नसतील त्यासाठी दु:खी होण्याचं कारण नाही. जर खेळाडू वर्षातील 10 महिने क्रिकेट खेळतील तर हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. तेव्हापासून आतापर्यंत बुमराह आराम करत आहे. नुकतीच त्याच्या पाठदुखीची तपासणी करण्यात आली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनफिट असल्याचं सांगितलं गेलं.
‘मला अशी चिंता सतावत आहे की, तो वर्षातील दहा महिने खेळत आहे. इतकं क्रिकेट खेळणार तर दुखापतीची शक्यता आहे. तसं पण जे खेळाडू संघात नाहीत त्यांच्याबाबत का चर्चा करायची. हा सांघिक खेळ आणि टीमला जिंकवायचं आहे. एखाद्या व्यक्तीला नाही. हे बॅडमिंटन, टेनिस किंवा गोल्फ नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम म्हणून भाग घेत आहोत. जर आपण एक टीम म्हणून खेळलो तर नक्कीच जिंकू.’, असं कपिल देव म्हणाले.
STORY | Playing 10 months a year will lead to more injuries: Kapil Dev (@therealkapildev)
READ: https://t.co/QU9e4d8z2E
VIDEO:
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/mnPFRSAi8F
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2025
टीम इंडियात मोहम्मद शमी 14 महिन्यानंतर परतला. गेल्या वर्षभरापासून दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर होता. मात्र त्याने आता कमबॅक केलं आहे. पण इंग्लंड दौऱ्यात त्याच्या गोलंदाजीला हवी धार दिसली नाही. दुसरीकडे, टीम इंडियात हार्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्यासारखे युवा गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आपल्या फलंदाजांवर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान, दुबईच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन संघात पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. पण दुबईची खेळपट्टी फिरकीपेक्षा मिडीयम पेसर्सला मदत करते.