
विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ मैदानात उतरला होता. सौराष्ट्र विरुद्धचा सामना दिल्लीने 3 विकेटने जिंकला. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 320 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 7 गडी गमवून 48.5 षटकात पूर्ण केलं. दिल्लीने इतकं मोठं लक्ष्य 7 चेंडू राखून गाठलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो नवदीप सैनी.. त्याने या सामन्यात तीन विकेट घेतल्या आणि 29 चेंडूत नाबाद 34 धावांची खेळी केली. दिल्लीने हा सामना जिंकला असला तरी कर्णधार ऋषभ पंतचा मात्र यात पराभव झाला आहे. हा पराभव म्हणजे ऋषभ पंत पुन्हा एकदा फलंदाजीत फेल गेला. या सामन्यात ऋषभ पंतला फक्त 22 धावा करता आल्या.
विजय हजारे ट्रॉफीच्या आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात ऋषभ पंत फेल गेला आहे. त्याने तीन सामन्यात फक्त 97 धावा केल्या आहेत. ऋषभ पंते एक अर्धशतकी खेळी केली खरी, पण त्यातही त्याचा स्ट्राईक रेट हा 85 चा होता. ऋषभ पंतचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी संघात इशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इशान किशन सध्या फॉर्मात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत आणि टी20 वर्ल्डकप संघात त्याची निवड केली आहे.
पंतने पुढच्या सामन्यात काही खास कामगिरी केली नाही तर त्याला वनडे संघातून डच्चू दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाच्या एकदिवसीय सेटअपमध्ये बसत नसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, इशान किशनला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेटमधून आराम दिला आहे. त्याने एकच सामना विजय हजारे ट्रॉफीत खेळला. त्यातही त्याने 320 च्या स्ट्राईक रेटने 125 धावा केल्या.
दुसरीकडे, ऋषभ पंतच्या जागेवर ध्रुव जुरेलनेही दावा ठोकला आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने तीन सामन्यात 153.5 च्या सरासरीने 307 धावा केल्यात. त्यामुळे पंतच्या जागेसाठी पर्याय तयार होताना दिसत आहे. पंतचं वनडे संघातील जागा अडचणीत आहे. दुसरीकडे, कसोटीत जागा मिळणं कठीण दिसत आहे. तसेच टी20 संघातही त्याला भाव मिळत नाही.