
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरची सध्या क्रीडाविश्वात चर्चा होत आहे. आयर्नपासून अनायापर्यंतचा प्रवास नुकताच पूर्ण केला. लिंग बदल करून आता मुलगी म्हणून सर्वांच्या परिचयात आली आहे. सध्या ट्रान्सजेंडर महिला म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. पुन्हा एकदा क्रिकेट मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. क्रिकेटविश्वात अनाया पुन्हा एकदा नावलौकीक मिळवण्यास इच्छुक आहे. लिंग बदल करण्यापूर्वी अनाया क्रिकेट खेळत होती. यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानसोबत क्रिकेटच्या मैदानात खेळली आहे. पण लिंग बदल केल्यानंतर ती क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. असं असताना अनाया बांगरने आयसीसी आणि बीसीसीआयकडे विनंती केली आहे. एक व्हिडीओ अनायाने शेअर करत त्यात बीसीसीआय आणि आयसीसीकडे विनंती केली आहे.
अनाया बांगरने सांगितलं की, ‘मी पहिल्यांदा रिपोर्ट शेअर करत आहे. मागच्या एका वर्षात मी जे काही अनुभवलं ते आता वैज्ञानिक दृष्टीकोनातून रेकॉर्डवर आलं आहे. आता मी हे बीसीसीआय आणि आयसीसीला पाठवणार आहे. कारण आता चर्चा भीतीच्या आधारावर नाही तर सत्य आणि तथ्यांवर अधारित व्हावी. माझा हेतू कोणाला दूर करणं नाही. तर सर्वांसाठी जागा तयार करणं आहे.’अनाया बांगरने पुढे स्पष्ट केलं की, ‘विज्ञान सांगतं की मी आता महिला क्रिकेटसाठी पूर्णपणे फिट आहे. पण प्रश्न असा आहे की, हे जग खरं ऐकण्याच्या स्थितीत आहे?’
23 वर्षीय अनायाने एचआरटीच्या एका वर्षानंतर क्रिकेट खेळण्याची इच्छा वर्तवली आहे. ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंना भाग घेण्याची परवानगी नसताना अनायाने बीसीसीआय आणि आयसीसीकडे ही मागणी केलं हे विशेष. 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतर आयसीसी बोर्डाच्या बैठकीत ही बंदी घालण्यात आली होती. अनाया आयर्न असताना मुंबईच्या इस्लाम जिमखान्याकडून खेळली नंतर लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये अंडर 19 कूचबिहार ट्रॉफीत पुडुचेरीकडू खेळला होता. यात त्याने सर्वाधिक 150 धावा केल्या होत्या. स्पर्धेत 2 अर्धशतकांसह 300 धावा केल्या होत्या. तसेच 20 विकेट घेतल्या होत्या.