
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघात बरीच उलथापालथ सुरु झाली आहे. या संघाने स्पर्धेपूर्वीच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. माजी वेगवान गोलंदाज जहीर खान लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक असणार आहे. यापू्र्वी संघासाठी ही जबाबदारी गौतम गंभीरने बजावली होती. मात्र मागच्या पर्वात कोलकात्यासोबत गंभीरने जुळवून घेतलं आणि ही जागा रिक्त राहिली. अखेर या जागेसाठी जहीर खानची निवड केली गेली आहे. जहीर खान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीसोबत काम करत होता. आता अशा सर्व घडामोडी घडत असताना केएल राहुलचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मागच्या पर्वात केएल राहुल आणि संजीव गोयंका यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात संजीव गोयंका केएल राहुलवर राग व्यक्त करताना दिसले होते. त्यामुळे केएल राहुल फ्रेंचायझी सोडणार असं सांगण्यात येत आहे. असं असताना संजीव गोयंका यांनी या प्रश्नावर मौन सोडलं आहे.
लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितलं की, मी सध्या होत असलेल्या चर्चांवर काही बोलू इच्छित नाही. केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स कुटुंबाचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. केएल राहुलने दोन दिवसांपूर्वीच कोलकात्यात संजीव गोयंका यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्याचं हे विधान खूपच महत्त्वाचं ठरत आहे. संजीव गोयंका यांच्या वक्तव्यानंतर केएल राहुलला लखनौ रिटेन करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण केएल राहुलची तशी इच्छा आहे की नाही हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे मेगा लिलावाच्या काही दिवसाआधी काय ते स्पष्ट होईल. तत्पूर्वी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडतील.
आयपीएल 2022 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला होता. यात लखनौ सुपर जायंट्सने 17 कोटी मोजून केएल राहुलला संघात घेतलं होतं. केएल राहुलच्या नेतृत्त्वात संघाने दोन वेळा बाद फेरीत धडक मारली होती. पण एकदाही अंतिम फेरी गाठू शकला नाही. मागच्या पर्वात संघाने चांगली कामगिरी केली होती. पण शेवटी गाडी रुळावरून घसरली. केएल राहुल 2013 पासून आयपीएल स्पर्धा खेळत आहे. केएल राहुल लखनौ सुपर जायंट्ससोबत येण्यापूर्वी पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादमधून खेळला आहे.