
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरामध्ये होत आहे. त्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण या सरावात एक चिंता वाढवणारी घटना घडली आहे. स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला याला सरावादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, थ्रो डाउन स्पेशालिस्टसोबत सराव करताना त्याला ही दुखापत झाली. फलंदाजी करताना त्याच्या कमरेच्या वर चेंडू लागला. वेदना असह्य झाल्याने त्याने मैदान सोडलं आणि तंबूत गेला. दुखापत होण्यापूर्वी ऋषभ पंतने जवळपास 50 मिनिटं सराव केला होता. आक्रमकपणे तो प्रत्येक चेंडू फटकावत होता. पण एका चेंडुने त्याला गंभीर दुखापत झाली आणि मैदान सोडावं लागलं.
ऋषभ पंतला झालेली दुखापत किती गंभीर? हे मात्र कळू शकलेलं नाही. त्याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. पण संघ व्यवस्थापक या स्थितीवर नजर ठेवून आहेत. मालिकेच्या सुरु होण्याच्या एक दिवस आधी ही दुखापत झाल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण ऋषभ पंत फिटनेस आणि फॉर्मला एक दिवस आधी अंतिम स्वरूप देत होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत आणि दुखापत याचं घट्ट नातं जमलं आहे. त्यामुळे संघाच्या आत बाहेर असतो. असंच जर सुरू राहिलं तर भविष्यात त्याला संघात स्थान मिळवणं कठीण होऊ शकतं.
ऋषभ पंत टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला दुखापत झाली आणि संघाबाहेर गेला तर त्याची जागा दुसरा विकेटकीपर घेईल. सध्या संघात दुसरा विकेटकीपर म्हणून केएल राहुलचा पर्याय आहे. दरम्यान, ऋषभ पंतला टी20 वर्ल्डकप संघातूनही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आता वनडे आणि कसोटी सामन्यावर भर देणं भाग आहे. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत. मालिकेतील पहिलाच सामना वडोदरामध्ये होणार आहे.