
विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव… अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहे. अजूनही त्याच्यात धावांची भूक आहे. कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने वनडे फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा मैदानात उतरला. पण सलग दोन वेळा त्याला खातंही खोलता आलं नाही. पण तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करत टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने आपला खरं रूप दाखवलं. सलग दोन वनडे सामन्यात शतक ठोकत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. वनडे कारकिर्दीत त्याने 53 वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84वं शतक ठोकलं आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यात काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, क्रीडाप्रेमींमध्ये आणखी एक चर्चा रंगली आहे. विराट कोहली शतकांचं शतक ठोकणार का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता या विक्रमाच्या मागे विराट कोहली लागल्याचं त्याचे चाहते सांगत आहेत. विराट कोहलीच्या दोन इनिंग पाहिल्यानंतर तो आरामात 101 शतकं ठोकू शकतो असा दावाही त्याच्या चाहत्यांनी केला आहे. आता प्रश्न असा आहे की, विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत किती सामने खेळणार? शतकांचं शतक ठोकण्यासाठी विराटला 16 शतकांची गरज आहे आणि मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 17 शतकांची आवश्यकता आहे.
टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत एकूण 19 सामने खेळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक सामना तर विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली तर एकूण 11 सामने खेळेल. अशा स्थितीत विराट कोहलीला एकूण 30 वनडे सामने खेळण्याची संधी मिळू शकते. पण या 30 सामन्यात 17 शतकं ठोकणं खूपच कठीण आहे. त्यामुळे विराट किती शतकांपर्यंत मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.