
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार या वर्षीच्या अखेरीस अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान टी20 वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद बांगलादेशकडे आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये ढाका आणि सिल्हेत येथे पार पडणार आहे. या दोन ठिकाणी स्पर्धेतील 23 सामने खेळवले जातील. दहा संघांची दोन गटात विभागणी केली गेली आहे. अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात वेस्ट इंडिज, बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि स्कॉटलँड हे संघ आहेत. टी20 क्रिकेटची वाढती लोकप्रियत आणि नवी देशांची रूची पाहता हा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
मात्र यानंतर या स्पर्धेत आणखी काही संघांचा सहभाग होणार आहे. आयसीसीने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 2030 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संघांची संख्या 16 पर्यंत पोहोचेल. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 12 संघ, टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत 12 सघ सहभागी होणार आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असून यात 12 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत संघ निवडण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 असेल. यासाठी अफ्रिका आणि युरोपमधून प्रत्येकी दोन संघ असतील. अमेरिकेतून एक आणि संयुक्त आशिया आणि ईएपी विभागीय अंतिम स्पर्धेतील तीन संघ असतील.
दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकारने आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर हायब्रिड मॉडेलवर भारताचे सामने श्रीलंकेत पार पडले होते. पण चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अशी काहीच चर्चा झाली नाही.