टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, निवृत्ती मागे घेणाऱ्या खेळाडूला स्थान

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. बांगलादेशमधील हिंसक परिस्थिती पाहता ही स्पर्धा युएई स्थलातंरित करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, निवृत्ती मागे घेणाऱ्या खेळाडूला स्थान
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2024 | 3:36 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. अवघ्या महिन्याभरानंतर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून त्यासाठी आता एक एक करत संघाची घोषणा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर आता वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व हेले मॅथ्यूज करणार आहे. अश्मिनी मुनिसार, मँडी मंगरू आणि अनकॅप्ड नेरिसा क्राफ्टनला या संघात स्थान दिलं गेलं आहे. पण संघातील डिएंड्रा डॉटिन या नावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोन वर्षापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. डिएंड्रा डॉटिनने वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये खराब वातावरण असल्याचं सांगत 2022 या वर्षी अचानक निवृत्ती जाहीर केली होती. पण मागच्या महिन्यात निवृत्ती मागे घेतली आणि आता तिला टी20 वर्ल्डकप संघात स्थानही मिळालं आहे. डिएंड्रा डॉटिन महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारी खेळाडू आहे.

डॉटिनला संघात घेण्याचं सर्वात मोठं कारण ठरलं ते कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा..या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी ती तिसरी फलंदाज ठरली. तिने चार डावात 113 धावा केल्या. यावेळी सरासरी 28.25 आणि स्ट्राईक रेट हा 111.88 इतका होता. इतकंच काय या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज आहे. तिने गुयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध 38 चेंडू 53 धावांची खेळी केली होती. एकंदरीत तिचा फॉर्म आणि खेळी पाहून हेड कोच शेन हेट्स यांनी सांगितलं की, तिच्या संघातील पुनरागमनाने आम्ही खूश आहोत. तिचा रेकॉर्डही खूप छान आहे.

आतापर्यंत झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या आठ पर्वात ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून आला आहे. ऑस्टेलियाने 6, इंग्लंड 1, तर वेस्ट इंडिजने एकदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत ब गटात वेस्ट इंडिज असून या गटात बांगलादेश, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि स्कॉटलंड हे संघ आहेत. वेस्ट इंडिजचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी 4 ऑक्टोबरला आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिज संघ : हेले मॅथ्यूज (कर्णधार), शमीन कॅम्पबेले, आलियाह एलेने, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार, चेडियन नेशन, चिनेल हेनरी, डिएंड्रा डॉटिन, करिश्मा रामहरैक, मँडी मंगरू, नेरिसा क्राफ्टन, कियाना जोसेफ, शमिलिया कोनेल, स्टेफनी टेलर, जॅडा जेम्स.