Womens World Cup: उपांत्य फेरीत ड्रेसिंग रुममधील एक वाक्य कांगारुंसाठी ठरलं पराभवाचं कारण

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखवली. कारण वर्ल्डकप स्पर्धेच्या बाद फेरीत 338 धावांच लक्ष्य गाठणं म्हणजे मोठी कामगिरी.. पण भारताचं मनोबल एका वाक्याने वाढलं होतं. कसं काय ते जाणून घ्या

Womens World Cup: उपांत्य फेरीत ड्रेसिंग रुममधील एक वाक्य कांगारुंसाठी ठरलं पराभवाचं कारण
Womens World Cup: उपांत्य फेरीत ड्रेसिंग रुममध्ये लिहिलेलं एक वाक्य कांगारुंसाठी ठरलं पराभवाचं कारण
Image Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Nov 01, 2025 | 4:19 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने साखळी फेरीत सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे उपांत्य फेरीत जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि उपांत्य फेरीतील जागा पक्की केली. शेवटचा बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारताला गुणतालिकेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत भारताचा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या आणि स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाशी झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काय भारतीय संघाला गाठता येणार नाही? असंच अनेकांना वाटलं होतं. पण भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक वाक्य प्रभावी ठरलं आणि सामन्यात विजय मिळाला.

भारतीय ड्रेसिंग रुममध्ये असं कोणतं वाक्य लिहिलं होतं की त्यामुळे फलंदाज प्रभावित झाले. तसेच मैदानात तग धरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक अमोल मुजूमदारने सांगितलं की ड्रेसिंग रूमध्ये कोणतं वाक्य लिहिलं होतं की ज्यामुळे भारतीय संघाला प्रेरणा मिळाली. अमोल मुजूमदार म्हणाला की, ड्रेसिंग रुममध्ये भारताचा डाव सुरु होण्यापूर्वी लिहिलं होतं की Need to get one more run than Australia म्हणजे आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी फक्त एक धाव जास्तीची हवी आहे.

भारतीय महिला संघाने प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी यांचं मन दुखावलं नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 338 धावांचं बलाढ्य आव्हान 9 चेंडू राखून पूर्ण केलं. भारताने 48.3 षटकात 5 गडी गमवून 441 धावा केल्या. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघांनी अद्याप जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार यात काही शंका नाही. भारतीय संघाने याआधी दोनदा अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली होती. मात्र तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे.