
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 17वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्ससमोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गुजरात जायंट्सने 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह गुजरात जायंट्सने टॉप 3 मधील स्थान पक्कं करण्याच्या दिशेने कूच केली आहे. दिल्ली कॅपिटल्स साखळी फेरीत आठ पैकी आठ सामने खेळली आहे. यात 5 सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे गुणतालिकेत 10 गुण असून +0.396 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुणतालिकेत उलथापालथ केली आहे. तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात आणि मुंबई इंडियन्सचे सारखेच गुण आहेत. मात्र रनरेटच्या बाबतीत गुजरात सरस ठरली आहे. गुजरात जायंट्स संघ 7 सामने खेळला असून 4 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर नेट रनरेट हा +0.334 इतका आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला अजूनही साखळी फेरीत दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्स 6 सामने खेळली असून 4 सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. खरं तर मुंबई इंडियन्सला थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. कारण सध्या गुणतालिकेत 8 गुण असून उर्वरित दोन सामने जिंकले तर थेट 12 गुण होतील. पण असं असलं तरी गुजरात आणि दिल्लीच्या सामन्यानंतर दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
आरसीबीचं गणित आता जर तर वर आहे. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तरी 8 गुण होतील. पण तिथेही नेट रनरेट चांगला असेल आणि गुजरात आणि मुंबईने शेवटचे सर्व सामने गमावले तर संधी मिळू शकते. अन्यथा खूपच कठीण आहे. दुसरीकडे युपी वॉरियर्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे.