
वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात सर्व गडी गमवून 164 धावा केल्या आणि विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबई इंडियन्सकडून नॅट स्कायव्हर ब्रंटने 59 चेंडूत 13 चौकरांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला बोर्डवर जास्तीत जास्त धावा लावण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मुंबई इंडियन्सचा पॉवर प्ले काही खास गेला नाही. हेले मॅथ्यूजच्या रुपाने पहिला धक्का बसला. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर स्लीपला मेग लेनिंगने तिचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर यास्तिक भाटियाही काही खास करू शकली नाही. यास्तिका फक्त 11 धावा करून बाद झाली. तिसऱ्या विकेटसाठी नॅट स्कायव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोघांनी 73 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौरने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या होत्या. पण अनाबेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना चूक झाली आणि थेट निक्की प्रसादच्या हाती चेंडू गेला.
कर्णधार हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर इतर फलंदाज काही खास करू शकले नाही. एका बाजूने नॅट स्कायव्हर ब्रंट खिंड लढवत होती. दुसरीकडे धडाधड विकेट पडत होत्या. अमेलिया करचं नशिब इतकं खराब होतं की नॅटने मारलेला शॉट मिनूच्या हाताला लागला आणि थेट स्टंपवर लागला यामुळे धावचीत होत तंबूत परतली. संजीवन संजना 1, अमनज्योत कौर 7 आणि संस्कृती गुप्ता 2 धावा करून तंबूरत परतली. शबनम इस्माईल तर एकही चेंडू न खेळता धावचीत होत तंबूत गेली.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णदार), अमेलिया केर, सजीवन सजाना, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लेनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, राधा यादव.