
मुंबईकर जेमीमाह रॉड्रिग्स हीने (Jemimah Rodrigues) टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी (Icc Womens World Cup 2025) जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. जेमीमाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत विक्रमी धावांचा पाठलाग करताना अविस्मरणीय शतक झळकावलं होतं. जेमीमाहला या स्पर्धेच्या सुरुवातीला काही खास करता आलं नाही. मात्र जेमीने निर्णायक क्षणी कमबॅक करत भारतासाठी बहुमुल्य योगदान दिलं. वूमन्स टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर आता श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. अशात आता जेमीमाहसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिट्ल्स फ्रँचायजीने डब्ल्यूपीएलच्या (WPL 2026) चौथ्या मोसमाआधी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेग लॅनिंग हीच्या जागी जेमीला नेतृत्वाची धुरा देण्यात येणार आहे. दिल्लीचं गेल्या 2 हंगामात मेग लॅनिंग हीने नेतृत्व केलं होतं. जेमीच्या कर्णधारपदी 23 डिसेंबरला नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत 23 डिसेंबरला अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार,जेमीला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमासाठी गेल्या महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी जेमीला कर्णधार करण्याचे संकेत दिले होते.
दिल्लीने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीला ऑक्शनद्वारे आपल्या गोटात घेतलं. त्यानंतर पार्थ जिंदाल यांनी भारतीय खेळाडूला कर्णधार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लॉरा कर्णधार होणार नसल्याचं स्पष्ट आहे. अशात आता जेमीची कर्णधारपदी वर्णी लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
जेमीने आतापर्यंत डब्लूपीएलच्या इतिहासातील 3 हंगामात एकूण 27 सामने खेळले आहेत. जेमीने या 27 सामन्यांमधील 24 डावांत 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जेमीने 28.26 च्या सरासरीने आणि 139.66 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्यात.
दरम्यान जेमीने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऐतिहासिक असं शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला त्या सामन्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान जेमीमाह रॉड्रिग्स हीच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं होतं. जेमीने त्या सामन्यात नाबाद 127 धावा करुन भारताला विजयी केलं होतं.