DC vs UP : दिल्ली युपीचा धुव्वा उडवत सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये, गतविजेता मुंबई आऊट

Delhi Capitals Women vs UP Warriorz Women Match Result : दिल्ली कॅपिट्ल्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफमध्ये पोहचण्याची परंपरा सलग चौथ्या मोसमातही कायम ठेवली आहे.

DC vs UP : दिल्ली युपीचा धुव्वा उडवत सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये, गतविजेता मुंबई आऊट
Delhi Capitals Women WPL 2026
Image Credit source: WPL X Account
| Updated on: Feb 02, 2026 | 2:33 AM

जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमात प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सची जेमिमाहच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहचण्याची पहिली तसेच एकूण आणि सलग चौथी वेळ ठरली. दिल्लीने बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सजचा धुव्वा उडवला. युपीने दिल्लीसमोर विजयासाठी 123 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 126 धावा केल्या. दिल्लीने यासह प्लेऑफचं तिकीट मिळवलं. तर युपीच्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतून पॅकअप झालं. युपीने हा सामना जिंकला असता तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहचली असती. मात्र दिल्लीने स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक दिली.

सामन्यात काय झालं?

दिल्लीने टॉस जिंकून युपीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीच्या गोलंदाजांसमोर युपी टीम पूर्ण 20 ओव्हर खेळली. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी युपीला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. युपीने 8 विकेट्स गमावून 122 धावा केल्या. युपीसाठी दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 24 धावा केल्या. सिमरन शेख हीने 22 तर चार्ली क्नॉट हीने 12 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी शिखा पांडे हीने नाबाद 23 धावांचं योगदान दिलं. दिल्लीकडून मारिजान काप हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर चिनले हेनरी आणि श्री चरणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

दिल्लीची बॅटिंग

दिल्लीने लिझेल ली हीच्या रुपात पहिली विकेट गमावली. ली हीने 10 धावा केल्या. त्यानंतर शफाली वर्मा हीने 29 धावांचं योगदान दिलं. तर लॉरा वॉल्वॉर्ड्ट हीने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. या चौघींनी योगादान देऊन दिल्लीला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. मात्र युपीने दिल्लीला झटपट 2 झटके दिले. त्यामुळे सामन्यात रंगत आली. मात्र त्यानंतर कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्स हीने निकी प्रसादसोबत आवश्यक धावा करुन दिल्लीला विजयी केलं.

कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सची निर्णायक खेळी

जेमिमाहने निर्णायक क्षणी 18 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. जेमिने या खेळीत 5 चौकार लगावले. तर निकी प्रसाद हीने नाबाद 4 धावा केल्या. तर यूपीकडून दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या तर शिखा पांडे, डीएन्ड्रा डॉटीन आणि सोफी एक्लेस्टोन या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.