
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसामातील (WPL 2926 Final) चॅम्पियन्स ठरली आहे. जॉर्जिया वॉल आणि कॅप्टन स्मृती मंधाना या जोडीने स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी आणि सर्वोच्च भागीदारी करुन आरसीबीला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे. या दोघींनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर आरसीबीने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत डब्ल्यूपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीची अशाप्रकारे ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. तर दिल्ली सलग चौथ्या मोसमातही अंतिम फेरीत विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
आरसीबीची या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. चिनले हेनरी हीने ग्रेस हॅरीसला 9 रन्सवर आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर स्मृती मंधाना आणि जॉर्जिया वॉल या जोडीने जे केलं ते ऐतिहासिक ठरलं.
स्मृती आणि जॉर्जिया या दोघाींनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 92 चेंडूत 165 धावांची भागीदारी केली. या दोघींनी केलेल्या भागीदारीमुळे आरसीबीचा विजयस निश्चित समजला जात होता. मात्र इथे मोठा ट्विस्ट आला. जॉर्जिया वॉल आणि रिचा घोष या दोघ दोघी झटपट आऊट झाल्या. जॉर्जिया वॉल 79 तर ऋचा घोष 6 धावा करुन बाद झाली. त्यामुळे आरसीबीची स्थिती 174-1 वरुन 181-3 अशी झाली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला. अशात चिनले हेनरी हीने स्मृती मंधना हीला 87 धावांवर आऊट करत सामन्यात आणखी रंगत आणली. त्यामुळे आरसीबीचा स्कोअर 18.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 191 असा झाला.
त्यामुळे आता आरसीबीला विजयासाठी 8 बॉलमध्ये 13 रन्सची गरज होती. नॅडीन डी क्लर्क आणि राधा यादव या दोघी मैदानात होत्या. मात्र झटपट विकेट गेल्याने आरसीबीवर दबाव होता. चाहत्यांची धाकधुक वाढली होती. अशात दिल्लीला आणखी 1 विकेटची संधी होती. मात्र मिन्नू मणी हीने 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर राधा यादव हीचा सोपा कॅच सोडला. त्यामुळे राधाला जीवनदान मिळालं, तसेच 2 धावाही मिळाल्या. त्यानंतर आरसीबीने पुढील 5 चेंडूत 11 धावा केल्या. आरसीबी यासह चॅम्पियन ठरली.
राधा यादव हीने अखेरच्या क्षणी 2 चौकारांसह 5 चेंडूत नाबाद आणि निर्णायक नाबाद 12 धावा केल्या. तर नॅडीन डी क्लर्क हीने 7 धावांचं योगदान दिलं. दिल्लीसाठी चिनले हेनरी हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर नंदीनी शर्मा आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.