WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोघांना विक्रमाची संधी, ख्वाजा-कमिन्स यशस्वी होणार?

Aus vs Sa Wtc Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्याच चुरस असणार आहे. या महाअंतिम सामन्यात 2 खेळाडू खास रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहेत.

WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोघांना विक्रमाची संधी, ख्वाजा-कमिन्स यशस्वी होणार?
Pat Cummins Australia Test Team
Image Credit source: AFP
| Updated on: Jun 07, 2025 | 8:35 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया 2023-2025 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरली. टीम इंडिया पहिल्या 2 प्रयत्नात अंतिम फेरीत अपयशी ठरली. त्यामुळे टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देत टेस्ट वर्ल्ड कप जिंकावा, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. या तिसऱ्या साखळीतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत.

हा सामना 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत पोहचण्याची ही एकूण आणि सलग दुसरी तर दक्षिण आफ्रिकेची पहिली वेळ आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर ही ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका पहिल्या फेरीत ही ट्रॉफी जिंकणार का? याकडेही चाहत्यांचं लक्ष आहे. त्यामुळे या महाअंतिम सामन्यात या 2 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा या दोघांना खास कामगिरी करण्याची संधी आहे. ख्वाजाला या महाअंतिम सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. उस्मानला यासाठी फक्त 70 धावांची गरज आहे. ख्वाजाने आतापर्यंत 80 सामन्यांमधील 144 डावांमध्ये 16 शतकं आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 930 धावा केल्या आहेत. उस्मानचा 232 हा हायस्कोर आहे.

पॅट कमिन्सला विकेट्सच्या त्रिशतकाची संधी

पॅट कमिन्सला या महाअंतिम सामन्यात 300 कसोटी विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. पॅट कमिन्सला त्यासाठी फक्त 6 विकेट्सची गरज आहे. पॅटने आतापर्यंत 67 कसोटी सामन्यांमध्ये 294 विकेट्स घेतल्यात. पॅट कमिन्सने 300 विकेट्स पूर्ण केल्यास तो ऑस्ट्रेलियाचा एकूण आठवा तर सहावा वेगवान गोलंदाज ठरेल. पॅटने आतापर्यंत 67 सामन्यांमध्ये 22.43 च्या सरासरीने 294 विकेट्स मिळवल्या आहेत. पॅटची 23 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तर पॅटने 13 वेळा 5 तर 2 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत.

17 सामन्यांमध्ये 73 विकेट्स

दरम्यान पॅट कमिन्स 2023-2025 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशीप साखळीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पॅटने 17 सामन्यांमध्ये 73 विकेट्स घेतल्या आहेत. पॅटची 91 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही या साखळीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तसेच पॅटने या साखळीत 5 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.