
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडणार आहेत. टीम इंडियाला टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद जिंकून दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ यासाठी कसून सराव करत आहे. मात्र या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूला स्थान द्यायचं आणि कोणाला बाहेर बसवायचं असा प्रश्न पडला आहे. त्यात ओव्हल मैदानावरील पिच वेगवान गोलंदाजांना मदत करणारं आहे. त्यामुळे फिरकीपटूंबाबत विचार करणं भाग आहे. आर. अश्विन की रवींद्र जडेजा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या संघात खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने 8 गड्यांनी गमावला होता. त्यावेळी इंग्लंडच्या विकेटवर दोन स्पिनर्स घेऊन खेळल्याने तेव्हा जोरदार टीका झाली होती.
आर. अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या इनिंगमध्ये 15 षटकात 18 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 10 षटकात 17 धावा देऊन दोन गडी टिपण्यात यश मिळवलं होतं. दुसरीकडे जडेजाने पहिल्या इनिंगमध्ये 7.2 षटकं टाकून 1 गडी बाद केला होता. तर दुसऱ्या इनिंगमध्ये गडी बाद करण्यात अपयश आलं होतं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात भारतीय संघात पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. स्टीव्ह स्मिथने नेहमीप्रमाणे भारताची अडचण ओळखून खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याचा दावा केला आहे. पण खरंच खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे का? असा प्रश्न पडतो.
मागच्या दहा कसोटी सामन्यांचा विचार करता वेगवान गोलंदाजांनी 2 हजार 413.3 ओव्हर टाकल्या आणि 57.4 च्या स्ट्राइक रेटने 252 गडी बाद केले. दुसरीकडे फिरकीपटूंनी फक्त 741 षटकं टाकली आणि 68 गडी बाद केले. त्यामुळे अश्विन की जडेजा असा प्रश्न पडला असून प्लेइंग इलेव्हनबाबत संभ्रम आहे. दोघांकडे अष्टपैलू म्हणून देखील पाहिलं जात आहे.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.