
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामना ड्रॉ झाला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार टॉम लॅथमने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 205 धावांवर गुंडाळलं. तसेच या धावांचा पाठलाग करताना 278 धावा केल्या आणि 9 विकेट गमावल्यानंतर डाव घोषित केला. यासह पहिल्या डावात न्यूझीलंडने 73 धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने दुसर्या डावात 128 धावा केल्या. त्यामुळे 73 वजा करता 55 धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं. न्यूझीलंडने 1 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या विजयानंतर मोठा उलटफेर पाहायला मिळत. यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तानला फटका बसला आहे. कारण न्यूझीलंड आणि श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 50 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर भारताची 48.15 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे भारताला आता टॉप 2 मध्ये स्थान मिळवणं खूपच कठीण जाणार आहे. कारण विजयी टक्केवारी वाढण्याची मोठी संधी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत होती. मात्र दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि विजयी टक्केवारी घसरली.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून पाचही जिंकले असून 100 टक्के विजयी टक्केवारी आहे. यासह पहिल्या स्थानी कायम आहेत. दक्षिण अफ्रिकेने 4 पैकी तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे 75 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडने आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. 30.95 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. बांग्लादेश दोन सामने खेळली असून एका सामन्यात पराभव आणि एक ड्रॉ झाला. त्यामुळे विजयी टक्केवारी 16.67 आहे. तर वेस्ट इंडिजने 7 पैकी 6 सामने गमावल्याने विजयी टक्केवारी 4.76 आहे.