WTC Final 2025 : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेपैकी लॉर्ड्संच मैदान कुणासाठी फायदेशीर? पाहा आकडे

South Africa vs Australia Wtc Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मानाच्या गदेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उभयसंघात 11 ते 15 जून दरम्यान हा महामुकाबला होणार आहे.

WTC Final 2025 : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेपैकी लॉर्ड्संच मैदान कुणासाठी फायदेशीर? पाहा आकडे
Lords Cricket Ground
Image Credit source: @HomeOfCricket
| Updated on: Jun 10, 2025 | 11:25 AM

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा पुढील काही तासांतच संपणार आहे. चाहत्यांना आयपीएल 2025 अंतिम सामन्यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे वेध लागले आहेत. येत्या पुढील काही तासांमध्ये 11 जूनपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर मानाच्या गदेसाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महामुकाबला होणार आहे. या अंतिम सामन्याच्या निकालानंतर टेस्ट वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे स्पष्ट होईल. या सामन्यानिमित्ताने दोघांपैकी कोणत्या संघासाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड फायदेशीर आहे? हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या तिसऱ्या साखळीतील अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्याचा थरार 11 ते 15 जून दरम्यान रंगणार आहे. तर 16 जून हा दिवस या सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाने याआधीच्या 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र यंदा दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाची जागा घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी राहिली होती. ऑस्ट्रेलियाने गेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियावर मात करत टेस्ट वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा अंतिम सामना लंडमधील ओवल मैदानात खेळवण्यात आला होता. मात्र यंदा क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर महाअंतिम सामना होणार आहे.

लॉर्ड्समध्ये कोण सरस?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी लॉर्ड्स  त्रयस्थ ठिकाण आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे लॉर्ड्समध्ये दोघांपैकी कोणता संघ सरस ठरला आहे? हे जाणून घेऊयात.

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी न्यूट्रल मैदान आहे. मात्र आकडे पाहिले तर या दोघांसाठी हा घरचाच मैदान आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या ग्राउंडवर दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाची लॉड्समध्ये कडक कामगिरी

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या महायुद्धानंतर लॉर्ड्समध्ये 23 कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाला फक्त 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर 12 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने 1991-1992 नंतर लॉर्ड्समध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेने त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत व्हावं लागलं आहे.