
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग याचं भारतीय क्रिकेट संघातील योगदान कोण विसरू शकत नाही. त्यांनी अनेक सामन्यात मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. दुसरीकडे, त्याचे वडील योगराज सिंग त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांच्यावर निशाणा साधला आहे. असं असताना आता योगराज सिंग यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला आहे. योगराज सिंग यांनी आपल्या मुलाखतीत युवराज सिंगच्या मित्रांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक जण त्याला घाबरत होतं. कारण तो सर्वात टॅलेंटेड होता. इतकंच नाही तर कोहली-धोनीसह युवराजच्या सर्व सहकाऱ्यांनी युवराजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांना एक प्रश्न विचारला गेला.
विराट कोहली कर्णधार म्हणून युवराजसाठी काही करू शकला असता का? असा प्रश्न योगराज सिंग यांना विचारण्यात आला. धोनीनंतर विराट कोहलीकडे वनडे आणि टी संघाची धुरा आली. पण तेव्हा युवराजला कमी संधी मिळाल्या. त्यानंतर त्याच वर्षी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्यात आलं. तेव्हा विराट कोहली आणि युवराज सिंगच्या मैत्रीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण योगराज सिंगने विराट युवराजचा मित्र नव्हता हे देखील स्पष्ट केलं. ‘यशाच्या पायरीवर कोणीही मित्र नसतं. तुम्ही एकटे असता. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश आहे तिथे कोणीही मित्र नसतं. मी युवराजला सांगितलं. एक मित्र शोध आणि तो मला दे.’
“यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या मार्गावर कोणीही मित्र नसतात. नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात. नेहमीच असे लोक असतात जे तुम्हाला खाली खेचू इच्छितात. युवराजची प्रत्येकाला भीती वाटत होती की तो माझी खुर्ची हिसकावून घेईल. कारण तो इतका महान खेळाडू होता, ज्याला देवाने निर्माण केले होते. तो महान खेळाडूंपैकी एक होता, प्रत्येकजण त्याला घाबरत होता, धोनीसह इतर सर्व खेळाडू त्याला घाबरत होते.”, असं योगराज सिंग म्हणाले.
योगराज सिंगने सांगितलं की भारतीय संघात इतक्या वर्षात सचिन तेंडुलकरच युवराजचा एकमेव मित्र होता. योगराज सिंग यांनी सांगितलं की, ‘युवराजचा एकमेव मित्र आहे तो त्याला पसंत करतो. तो आहे महान खेळाडू सचिन तेंडुलकर. तो युवराजला भावासारखं मानतो. तो एकमेव व्यक्ती असा आहे की सर्वांना यशस्वी होताना पाहू इच्छितो.’