
मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी दोन वर्ल्ड कप आपल्या नेतृत्त्वाखाली जिंकून दिलेत. 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 चा वन डे वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. दोन्ही वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंह याने महत्त्वाची भुमिका बजावली होती. युवराज सिंहने वर्ल्ड कपदरम्यान कर्करोगाचा सामना केला होता. आज या हिरोचा वाढदिवस असल्याने त्याने केलेल्या विक्रमाची चर्चा झालीच पाहिजे. युवराजने एक अशी चूक केलेली की चाहत्यांचा त्याचा राग आला होता.
2007 मध्ये इग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याला गड्याने सलग सहा सिक्सर मारले होते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने सहा सामन्यात148 धावा केल्या होत्या. तर 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या होत्या. या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहला मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलं होतं.
2011 च्या वर्ल्ड कपनंतर युवराज सिंहने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करत जबरदस्त कमबॅक केलं होतं. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये युवराजने सर्व देशवासियांना नाराज केलं होतं. श्रीलंकेविरूद्धच्या फायनल सामन्यामध्ये शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या संथ खेळीमुळे युवीला या पराभवसाठी जबाबदार पकडलं जातं. युवराजने 21 बॉलमध्ये अवघ्या 11 धावा केल्या होत्या, युवराजसारख्या हिटरकरडून अशी अपेक्षा कोणालाच नव्हती.
टीम इंडियाने फायनल सामन्यात 20 ओव्हरमध्ये 130 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने अवघ्या 17.5 ओव्हरमध्ये चार विकेट गमावत टार्गेट पूर्ण केलं होतं. या सामन्यात कुमार संगकारा याने नाबाद 52 धावांची खेळी करत टी-20 वर्ल्ड कप संघावर नाव कोरलं होतं. श्रीलंका संघाचा लसिथ मलिंगा कर्णधार होता.
दरम्यान, युवराज सिंहवर चाहत्यांचा राग तेवढ्यापुरता होता. टीम इंडियाने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराजने हिरोची भूमिका बजावली होती. त्यामुळे एका संथ खेळीमुळे युवराज कायमच व्हिलन ठरणार नाही.