
लीड्स येथील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलय. एजबेस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दोन दिवसाच्या खेळातच टीम इंडियाने इंग्लंडला बॅकफूटवर ढकललय. कॅप्टन शुबमन गिलने ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली. त्या बळावर भारताने पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. सध्या टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये आहे. इतकी विशाल धावसंख्या उभारूनही टीम इंडिया नाही, इंग्लंडच्या टीमकडे विजयाची संधी आहे. तुम्ही हे वाचून हैराण व्हाल. पण हे आम्ही नाही, आकडे सांगतायत.
एजबेस्टन येथे 2 जुलैला भारत-इंग्लंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु झाला. मॅचच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 310 धावा केल्या. कॅप्टन गिलने शतक झळकावलं होतं. दुसऱ्यादिवशी टीम इंडियाने त्यापुढे खेळायला सुरुवात केली. गिलने टेस्ट क्रिकेटमधील आपलं पहिलं द्विशतक झळकावलं. त्याच्या 269 धावांच्या रेकॉर्ड इनिंगच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या.
आकडे काय सांगतात?
इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच देशात जवळपास 600 धावा करणं ही सोपी गोष्ट नाहीय. टेस्ट क्रिकेटमध्ये कुठलीही टीम पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा इतक्या धावा करते, त्यावेळी बहुतांशवेळा विजय त्यांचाच होतो किंवा सामना ड्रॉ होतो. अशावेळी टीम इंडियाच्या 587 धावा ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र, इंग्लंडचे मागच्या तीन वर्षापासूनच आकडे चिंतेत टाकणारे आहेत.
तिन्ही वेळा इंग्लंडची टीमच जिंकली
2022 नंतर अशी फक्त चौथी वेळ आहे, ज्यावेळी इंग्लंडच्या टीम विरुद्ध कुठल्या संघाने एका इनिंगमध्ये 550 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी तीनवेळा प्रतिस्पर्धी टीमने 550 पेक्षा जास्त धावा करुन अखेरीस मॅच इंग्लंडच्याच टीमने जिंकली. पाकिस्तानने 2022 साली रावळपिंडी येथे 579 धावा केल्या होत्या. त्याचवर्षी नॉटिंघम येथे न्यूजीलंडने 553 रन्स केल्या. 2024 साली पाकिस्तानने मुल्तानमध्ये 556 धावांचा डोंगर उभारला. इतका स्कोर करुनही तिन्ही सामन्यात इंग्लंडची टीम विजयी ठरली.
नक्कीच इतिहास बदलण्याची अपेक्षा
587 धावा करुन टीम इंडियाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण इंग्लंडचे हे आकडे पाहून कॅप्टन शुबमन गिल आणि कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढू शकतं. भारतीय गोलंदाजांनी ज्या पद्धतीने सुरुवात केलीय, त्यामुळे नक्कीच इतिहास बदलण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्यादिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने 77 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट गमावले होते. आकाश दीपने इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन चेंडूंवर बेन डकेट आणि ओली पोपला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने जॅक क्रॉलीची विकेट काढली.