ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!

| Updated on: Jul 15, 2019 | 7:49 AM

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे.

ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!
Follow us on

ENGvsNZ  लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी 50 षटकात 8 विकेट गमावत इंग्लंडसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, इंग्लंडचा संघ 50 षटकांत 241 धावाच करु शकला आणि सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे विश्वचषकाचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हरही खेळवावी लागली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिली आणि तेथेही बरोबरी झाली. मात्र, इंग्लंडने दोन चौकार मारलेले असल्याने इंग्लंड विश्वविजेता ठरला.

बोल्टने घेतलेल्या झेलाने हा सामना फिरवला. न्यूझीलंडला ओव्हर थ्रोच्या धावांचाही फटका बसला. मात्र, आज नशीब इंग्लंडच्या बाजूने असल्याने ‘सुपर ओव्हर’मध्येही टाय आणि जास्त चौकार अशा एकत्रित संयोगाने विश्वचषक इंग्लंडकडे आला. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने सिंहाचा वाटा उचलला.  इंग्लडकडून बेन स्टोक्सने नाबाद 84 धावांची तुफान खेळी केली. जॉस बटलरने देखील त्याला साथ देत 59 धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी केली. इंग्लंडचा लोकी फर्गुसन आणि जेम्स नीशम यांनी न्यूझीलंडच्या प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दुसरीकडे न्यूझीलंडकडून हेनरी निकोलने 55 तर टॉम लॅथमने 47 धावांची खेळी केली. तसेच न्यूझीलंडचे गोलंदाज क्रिस वोकर आणि लियाम प्लंकेट यांनी देखील इंग्लंडच्या प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. मात्र, न्यूझींलडच्या काही चुकांनी त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले.

क्रिकेट चाहत्यांनाही या सुपर ओव्हरच्या थराराचा आनंद घेतला. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना झाला. विशेष म्हणजे इंग्लंडने तब्बल 27 वर्षांनी फायनलमध्ये धडक दिली होती. इंग्लंडने आतापर्यंत 3 वेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र, एकदाही विश्वचषक जिंकलेला नव्हता. मात्र, यावेळी नशिबाच्या जोरावर इंग्लंड विश्वविजेता ठरला.