
वेस्ट इंडिजच्या एका फलंदाजाने प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांना इतकं धुतलं की, ते दीर्घकाळ ही गोष्ट स्मरणात ठेवतील. वेस्ट इंडिजच्या या फलंदाजाच नाव आहे, एविन लुईस. 15 जूनला आयर्लंड विरुद्ध सीरीजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात लुईसची धुवधार बॅटिंग पहायला मिळाली. या T20 मॅचमध्ये एविन लुईस आयर्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. 206 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या. यात 15 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. परिणामी वेस्ट इंडिजने तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यासह सीरीज जिंकली.
वेस्ट इंडिजने आयर्लंड विरुद्ध शेवटचा T20 सामना 62 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. सोबतच आयर्लंड विरुद्धची तीन सामन्यांची सीरीज 1-0 ने जिंकली. दोन्ही टीम्समधील सीरीजचा पहिला आणि दुसरा T20 सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही.
यात चार सिक्स आणि तितकेच चौकार
आयर्लंड दौऱ्यावर वेस्ट इंडिज टीमने तिसऱ्या T20 सामन्यात पहिली फलंदाजी केली. एविन लुईस आणि कॅप्टन शे होपची जोडी ओपनिंगसाठी मैदानात उतरली होती. त्यांनी वेस्ट इंडिजचा एक मजबूत सुरुवात दिली. दोघांनी 10.3 ओव्हर्समध्ये 122 धावांची पार्टनरशिप केली. शे होपने 25 चेंडूंचा सामना करताना 188.88 च्या स्ट्राइक रेटने 51 धावा केल्या. यात चार सिक्स आणि तितकेच चौकार आहे.
कुठलीही दया-माया दाखवली नाही
होप आऊट झाला. पण लुईसने आयर्लंडच्या गोलंदाजांना कुठलीही दया-माया न दाखवता त्यांचा समाचार घेतला. लुईसने त्यांची जोरदार धुलाई केली. एविन लुईस आपल्या आणखी एका T20 शतकाच्या जवळ पोहोचला होता. त्याने आयर्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पण लुईसच T20 शतक हुकलं. एविन लुईसने 44 चेंडूंचा सामना करताना 206.81 च्या स्ट्राइक रेटने 91 धावा केल्या. 63 मिनिटांच्या बॅटिंगमध्ये त्याने 15 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. म्हणजे 15 फोर-सिक्स मारले. यात 8 सिक्स आणि 7 बाऊंड्री आहेत.
आयर्लंडच्या टीमने किती धावा केल्या?
एविन लुईसच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर वेस्ट इंडिजने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 256 धावांचा विशाल स्कोर उभा केला. प्रत्युत्तरात 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेली यजमान आयर्लंडच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 194 धावाच करता आल्या.