
India Vs Pak: रविवारी 21 सप्टेंबर रोजी दुबईत खेळल्या गेलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हस्तांदोलन न करण्याच्या वादाला एक नवीन वळण मिळालं. कारण यावेळी मुद्दा खेळाडू किंवा आयसीसी अधिकाऱ्यांशी संबंधित नव्हता, तर टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरचा होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा विकेट्सने पराभूत केलं. मॅच संपल्यानंतर गौतम गंभीरने त्याच्या खेळाडूंना फक्त पंचांशी हस्तांदोलन करण्याचे निर्देश दिले, पाकिस्तान संघाशी नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टॉसदरम्यान आधी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतरही तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले. त्यांनीही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं. तेव्हा गौतम गंभीरने नंतर भारतीय खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावलं आणि फक्त पंचांशी हस्तांदोलन करण्याची सूचना केली. या सूचनेनुसार खेळाडू पंचांशी हस्तांदोलन करून परतले. हे पाहून पाकिस्तानी खेळाडू गोंधळून गेले. मॅच संपल्यानंतर गौतमने इन्स्टाग्रामवर भारतीय खेळाडूंचा फोटो शेअर करत फक्त एकच शब्द लिहिला, ‘निर्भिड’.
🗣️ Arey umpire se to mil loo!!
Gautam Gambhir invited the Indian players to exchange handshakes—but only with the umpires 😂pic.twitter.com/iBkdhye87j
— KKR Karavan (@KkrKaravan) September 21, 2025
टीम इंडियाने ‘सुपर फोर’ फेरीतही पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखलं. अभिषेक शर्मा (39 चेंडूंत 74) आणि शुभमन गिल (28 चेंडूंत 47) यांच्या आक्रमक खेळींच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणं टाळलं. अभिषेक शर्माने अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक साकारलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-20 सामन्यात हे आजवरचं दुसरं सर्वांत जलद अर्धशतक ठरलं. सर्वांत जलद अर्धशतक पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिझच्या नावे असून त्याने 2012 मध्ये 23 चेंडूंत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
पहलगाम इथला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ याच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांतील संबंध आणखीच बिघडले. त्याची झलक क्रिकेटच्या मैदानावरही पहायला मिळाली. याआधीच्या पाकिस्तानविरोधी सामन्यातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं.