कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम

| Updated on: Jun 10, 2020 | 1:15 AM

कोरोना संकंटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही महत्त्वपूर्ण ICC New Rules) नियमांना मंजूरी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम
Follow us on

मुंबई : कोरोना संकंटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही महत्त्वपूर्ण (ICC New Rules) नियमांना मंजूरी दिली आहे. कसोटी सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूत कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात स्थान देण्यास आसीसीने परवानगी दिली आहे. याशिवाय चेंडूला चमकवण्यासाठी आता खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नाही. याशिवाय सामन्यासाठी स्थानिक पंचांची नियुक्ती केली जाणार आहे (ICC New Rules).

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शिफारसी केल्या होत्या. या शिफारसी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयसीसीच्या कार्यकारी समितीने या शिफारशींना मंजुरी दिली. त्यानुसार चार नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

चार नवे नियम कोणते?

1. खेळाडूंची बदली

कसोटी सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्या खेळाडूऐवजी दुसऱ्या खेळाडूला सामन्यात स्थान दिलं जाईल. मात्र, हा निर्णय सध्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी राहणार नाही.

2. स्थानिक पंचांची नियुक्ती, अतिरिक्त डिआरएस

कसोटी सामन्यात आता स्थानिक पंचांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांचे अनुभव पाहता दोन्ही संघांना आता प्रत्येकी एक अतिरिक्त डीआरएसदेखील मिळणार आहे.

3. खेळाडूंच्या जर्सीवर 32 इंचच्या अतिरिक्त लोगोंना परवानगी

कोरोना संकंट काळात क्रिकेट बोर्डाला आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. हे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी खेळाडूंच्या जर्सीवर 32 इंचाचे अतिरिक्त लोगो लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

4. खेळाडूंना चेंडूला लाळ लावण्यास मनाई

खेळाडूंकडून चेंडू चमकवण्यासाठी लाळचा वापर केला जातो. मात्र, चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयसीसीने या गोष्टीस मनाई केली आहे. खेळाडूंनी चेंडूला लाळ लावली तर पंचांकडून खेळाडूला दोन वेळा इशारा दिला जाईल. तरीही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी म्हणजे त्या संघाच्या धावांमध्ये पाच धावा आणखी जोडल्या जातील.