ऑस्ट्रेलियाने रणशिंग फुंकले, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनची निवड करण्यात आली आहे. हा सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल (Cricket Australia announces Border-Gavaskar Test Series Schedule against India)

ऑस्ट्रेलियाने रणशिंग फुंकले, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

सिडनी : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये डिसेंबर महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका होण्याची चिन्हे आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाने वर्षअखेरीस मालिकेचे नियोजन आखले असून चार ठिकाणेही निश्चित केली आहेत. (Cricket Australia announces Border-Gavaskar Test Series Schedule against India)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका रद्द होईल, की पुढे ढकलली जाईल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करुन तयारी दर्शवली आहे. सध्या भारतात क्रिकेट सामने बंद आहेत, मात्र काही देशांनी हळूहळू सामने खेळवण्याची चाचपणी सुरु केली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनची निवड करण्यात आली आहे. हा सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. मालिकेचा दुसरा कसोटी सामना डे-नाईट खेळवला जाणार आहे. अॅडलेडमध्ये 11 ते 15 डिसेंबर दरम्यान हा सामना रंगेल.

मालिकेचा तिसरा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. तर सिडनीमधील चौथा सामना 3 ते 7 जानेवारी या कालावधीत होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच ठिकाणी सर्व कसोटी सामने खेळेल, असे आधी वृत्त होते. मात्र ऑस्ट्रेलिया चार वेगवेगळ्या स्टेडियमची तयारी केल्याचं दिसतं. cricket.com.au या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

भारताने याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा 2-1 ने पराभव केला होता. त्यामुळे यजमान संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार की टीम इंडिया विजयाची पुनरावृत्ती करणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पर्थमध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना खेळून मौसमाची सुरुवात करेल. या दोन देशांमधील हा पहिलाच कसोटी सामना असेल.

हेही वाचा : मैदानावर उतरणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू, पालघरच्या पठ्ठ्याचा सराव सुरु

ऑस्ट्रेलिया यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन करणार आहे, मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे भवितव्य अधांतरी आहे.

(Cricket Australia announces Border-Gavaskar Test Series Schedule against India)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *