
आयसीसीने ताजी टी २० क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले गेलेले नाहीत, त्यामुळे टॉप 5 फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र भारताचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वालला या क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमची क्रमवारी घसरली आहे. सध्या कोणता खेळाडू कितव्या क्रमांकावर आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
टॉप ५ मध्ये ३ भारतीयांचा समावेश
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड आयसीसीच्या टी२० क्रमवारीत नंबर वन फलंदाज आहे. त्याच्या नावावर ८५६ रेटिंग गुण आहेत. भारताचा अभिषेक शर्मा ८२९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिल साल्ट ८१५ रेटिंगसह तिसऱ्या, भारताचा तिलक वर्मा ८०४ रेटिंगसह चौथ्या आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ७३९ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
यशस्वी जयस्वालला फायदा
फलंदाजांच्या क्रमवारीत जोस बटलर ७३५ रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे, तर श्रीलंकेचा पथुम निस्सांका सातव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट आठव्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेच्या कुशल परेराला या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे.परेरा आणि रीझा हेंड्रिक्स संयुक्तपणे ९ व्या क्रमांकावर आहे. यशस्वी जयस्वालनेही दोन स्थानांची झेप घेतली आहे. तो ११ व्या स्थानावर आहे.
बाबर आझमला मोठा फटका
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमला या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तो सध्या पाकिस्तानच्या टी-२० संघाबाहेर आहे आणि त्यामुळे तो तीन स्थानांनी घसरला आहे. तो आता ६६१ रेटिंगसह १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझमचा सहकारी मोहम्मद रिझवानलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता ६५४ रेटिंगसह १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.