
टीम इंडियाने ग्रुप A मधून सर्व सामने जिंकून T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका या तीन संघांविरुद्ध विजय मिळवला. ग्रुप A मधून भारत आणि अमेरिका हे दोन संघ पात्र ठरले. टीम इंडिया आणि अमेरिकेकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं. आता सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडियासमोर दिग्गज संघांच आव्हान असणार आहे. सध्या कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड यांना बलाढ्य संघांविरुद्ध होणाऱ्या मॅचेसपेक्षा पण दुसऱ्याच गोष्टीची चिंता जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल, सामन्यापेक्षा दुसरी चिंता कुठली? ही दुसरी चिंता आहे पावसाची. तुम्ही ग्रुप स्टेजमध्ये पाहिलं असेल, पावसान अनेक बलाढ्य टीम्सचा खेळ कसा बिघडवला?. सुपर-8 राऊंडमध्येही तोच धोका कायम आहे. कॅरेबियन म्हणजे वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडिया सुपर-8 चे सामने खेळणार आहे.
टीम इंडियाचे काही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीयत. रोहित शर्मा आणि कंपनीसाठी हा फॉर्म फार मोठा चिंतेचा विषय नाही. पण पाऊस टीम इंडियाच्या सेमीफायनलच्या मार्गात मोठा अडथळा ठरु शकतो. यंदाचा T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज-अमेरिकेमध्ये होत आहे. टीम इंडिया सुपर-8 चे तिन्ही सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाच्या तिन्ही सामन्यांच्यादिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
20 जून रोजी बार्बाडोसच्या केनसिंगटॉन ओव्हलवर अफगाणिस्तान विरुद्ध पहिला सामना आहे. यूकेच्या हवामान विभागानुसार त्या दिवशी पाऊस कोसळण्याची शक्यता 10 टक्के आहे. 22 जून रोजी अँटिग्वा येथे बांगलादेश विरुद्ध दुसरा सामना होणार आहे. त्यावेळी पावसाची शक्यता 20 टक्के आहे. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा तिसरा, महत्त्वाचा सामना 24 जून रोजी सेंट लुसियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. या सामन्याच्यावेळी 50 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. हा सामना रद्द झाल्यास ग्रुप 1 मधून उपांत्यफेरीत कोण जाणार? हा गुंता वाढू शकतो. त्यामुळे तिन्ही सामने, रनरेट टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.