IND vs NZ 1st Test : टीम इंडियाला मिळाली जबरदस्त स्टार्ट, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल न्यूझीलंडवर पडले भारी
IND vs NZ 1st Test : वेलिंग्टन येथे भारत-न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव आटोपला असून आता भारतीय फलंदाज मैदानात उतरले आहेत. टीम इंडियाला यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने चांगली स्टार्ट दिली आहे.

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्यादिवशी भारताने जबरदस्त स्टार्ट केली आहे. टेस्ट मॅचची पहिली इनिंग सुरु आहे. वेलिंग्टन मध्ये हा कसोटी सामना होत आहे. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करताना 368 धावा केल्या. हेनरी निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांच्या चिवट खेळीच्या बळावर न्यूझीलंडच्या टीमला 368 धावसंख्या गाठता आली. दोघांनी शतकं झळकवली. हेनरी निकोल्स 335 चेंडूत (175) धावा आणि ग्लेन फिलिप्सने 216 चेंडूत (118) धावा केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली. निकोल्स आणि फिलिप्सला बाद करताना भारताच्या चांगल्याच नाकीनऊ आल्या. दोघांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. कालच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सुरुवातीच्या सत्रावर भारताने वर्चस्व गाजवलं होतं. 5 बाद 70 अशी न्यूझीलंडची अवस्था होती.
तिथून न्यूझीलंडने पहिल्या दिवस अखेर 243 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे पाच विकेट शिल्लक होते. आज 125 धावांची भर घातल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 368 धावांवर आटोपला. ग्लेन फिलिप्सचा मुख्य अडथळा आकाश दीपने दूर केला. 286 रन्सवर फिलिप्सच्या रुपाने न्यूझीलंडची सहावी विकेट पडली. त्यानंतर आणखी 82 धावा जोडल्यानंतर न्यूझीलंडच्या उर्वरित चार फलंदाजांनी तंबूची वाट धरली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या शेपटाला जास्त वळवळण्याची संधी दिली नाही.
यशस्वी जैस्वाल-केएल राहुलची दमदार सुरुवात
भारताकडून जसप्रीत बुमरहाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. आकाशदीपने तीन, अंशुल कंबोजने दोन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट काढला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मिळून 10 विकेट काढल्या. स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला एकही विकेट मिळाली नाही. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी दमदार सुरुवात करुन दिली आहे. यशस्वी जैस्वालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 13 आणि केएल राहुलने चार चौकार मारले आहेत. भारताच्या बिनबाद 100 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाने असाच खेळ करावा अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. यशस्वी जैस्वालचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला वनडे आणि टी20 मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं.