Shubman Gill: पहिल्या वनडेमध्ये तर त्याला बाहेरच बसवणार…Playing Xi बद्दल गिलकडून मोठी हिंट
IND vs NZ 1st ODI: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार ते गिलने बोलून दाखवलं आहे.

IND vs NZ ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने माध्यमांशी संवाद साधला आणि प्लेइंग इलेव्हनबद्दल संकेत दिले. गिलने थेट सांगितले की, पहिले चार फलंदाज निश्चित आहेत, परंतु ५ व्या आणि ६ व्या क्रमांकासाठी बदल केले जाऊ शकतात.
पहिल्या वनडेत श्रेयस अय्यरला वगळले जाऊ शकते. तो बॅक टू बॅक सामने खेळताना दिसत आहे, त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. श्रेयसला विश्रांती दिल्यावर ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल. तो पहिल्या सामन्यात खेळू शकतो असं गिलने बोलून दाखवले आहे.
गिल म्हणाला, “५ व्या आणि ६ व्या क्रमांकासाठी आमचं अजून ठरलेलं नाही, आमचे पहिले चार फलंदाज निश्चित आहेत आणि ते सर्व उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे, जर डावखुऱ्या फलंदाजाची गरज असेल, तर अक्षर भाई संघात येऊ शकतो आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार केएल भाईलाही संधी मिळू शकते. याचा अर्थ काही प्रमाणात लवचिकता आहे. जेव्हा हार्दिक भाई संघात परत येईल, तेव्हा ७ व्या आणि ८ व्या क्रमांकाची जागाही निश्चित होईल. विश्वचषकापूर्वी मी आमच्या फलंदाजी गटावर समाधानी आहे.”
गिल हार्दिकबद्दलही बोलला, “आमच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि जगात असे खूप कमी खेळाडू आहेत ज्यांच्याकडे त्याच्यासारखी क्षमता आहे. आशा आहे की, तो काही देशांतर्गत सामने खेळेल आणि पुनरागमन करेल. भारत ‘अ’ संघाच्या सामन्याच्या अगदी आधी त्याला किरकोळ दुखापत झाली हे दुर्दैवी आहे.”
न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत गिल म्हणाला, “जर आपण बुमराह आणि हार्दिकसारख्या काही महत्त्वाच्या खेळाडूंशिवायही मालिका जिंकलो, तर आमच्यासाठी ही एक मोठी प्रेरणा असेल. तर मला मानेचा कोणताही त्रास जाणवला नाही आणि मी आपली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची कर्तव्ये कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडली.”