IND vs PAK : 15 फेब्रुवारीची तारीख आणि पाकिस्तान विरुद्ध दणदणीत विजय, हा टीम इंडियासाठी चांगला संकेत नाही का?

IND vs PAK T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तानमधील टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात यावेळी स्टोरीमध्ये थोडा बदल झाला. निकाल तोच आहे पण विजयाचं अंतर वाढलय. यावेळी भारतीय टीमने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला.

IND vs PAK : 15 फेब्रुवारीची तारीख आणि पाकिस्तान विरुद्ध दणदणीत विजय, हा टीम इंडियासाठी चांगला संकेत नाही का?
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 7:44 AM

कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवून सुपर-8 मधील प्रवेश पक्का केला. सामन्याच्या या निकालाचं कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. पण पाकिस्तानी टीमने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते थोडं चक्रावून टाकणारं होतं. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आपल्या रेकॉर्ड मध्ये सुधारणा केली. या निकालानंतर अनेकांना असं वाटतय की, टीम इंडिया सहज दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल. पण या विजयामुळे टीम इंडियाकडून टी20 वर्ल्ड कप तर निसटणार नाही ना?.

वरचा मजकूर वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना?. टीम इंडिया इतकं जबरदस्त प्रदर्शन करतेय, मग तुम्ही अशा निकालाचा कसा काय विचार करु शकता?. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. पण अचानक एक असा योगायोग बनतोय, त्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. त्याचं कारण पाकिस्तान विरुद्ध मिळालेला हा विजय आहे. हा योगायोग काय आहे? त्याचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.

15 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये हा सामना 15 फेब्रुवारीला खेळला गेला. टीम इंडियाने सहजतेने हा सामना जिंकला. पण ही पहिली वेळ नव्हती, जेव्हा कुठल्या वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं असेल. याआधी वर्ल्ड कप 2015 मध्ये सुद्धा भारतीय टीमने 15 फेब्रुवारीलाच पाकिस्तानला हरवलं होतं.

22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या

इतकचं नाही, रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी झाली. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून शिव भक्तांना आणि संपूर्ण देशाला या प्रसंगी सुंदर गिफ्ट दिलं. याने 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. याआधी 2003 साली भारत-पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला.

वर्ल्ड कप फायनलशी काय संबंध?

आता हा संयोग काय आहे ते समजून घ्या. टीम इंडियाचा 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियानेच वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला हरवलं होतं. यावर्षी 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाचदिवशी होते. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवलय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कपपासून वंचित रहावं लागणार का? की, सूर्यकुमार यादवची टीम इतिहास बदलणार? पुढच्या काही दिवसात या प्रश्नाचं उत्तर मिळेल.