नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
Dhruv Jurel IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे, या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ध्रुव जुरेलने शतकी खेळी खेळली, आता या शतकी खेळीनंतर ध्रुवने एक विधान केले.

IND vs SL Test Series: ध्रुव जुरेलने कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार शतक झळकावले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जुरेलने नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ११५* धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर जुरेलने एक अनोखे सेलिब्रेशन केले. ध्रुवने त्याच्या बायसेपवर जय जवान जय किसान हा टॅटू गोंदवला आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने हे टॅटू दाखवला. आता यानंतर ध्रुव जुरेलने दिवस संपल्यानंतर एक विधान केले.
पंतबद्दल जुरेल काय म्हणाला?
ध्रुव जुरेलने शतकी खेळी खेळल्यानंतर म्हणाला की,मी सल्ला घेण्यासाठी नियमितपणे पंतशी बोलतो, जेव्हा कधी तो आसपास असतो, तेव्हा मी त्याचा सल्ला घेतो कारण त्याने खूप क्रिकेट खेळले आहे आणि त्याला खूप अनुभव आहे. मी त्याला नेहमी विचारतो की मी पुढे काय करावे, आणि त्याची खूप मदत झाली आहे.” पंतच्या अनोख्या फलंदाजी शैलीबद्दल विचारले असता, जुरेल म्हणाला की “मी आपल्या वरिष्ठ भारतीय सहकाऱ्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकाची खेळण्याची एक वेगळी शैली असते आणि त्यामुळेच हा खेळ सुंदर बनतो. पंत वेगळ्या पद्धतीने खेळतो आणि अनेक फटके मारतो, पण मी त्याच्यासारखा खेळू शकत नाही. मी लहानपणापासून जसा खेळत आलो आहे तसाच खेळतो आणि माझ्या गेम प्लॅनला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो. यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पंतचा अनुभव, कोणत्या गोलंदाजांवर हल्ला करायचा आणि कोणत्या स्पेल खेळायच्या हे समजून घेण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरला आहे.”
जुरेल म्हणाला की, भारताचे प्रतिनिधित्व करताना थोडा दबाव असला तरी, एक महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर मी पटकन स्वतःला सावरायला शिकलो आहे. हे तणावमुक्त असणार नाही, कारण जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता, तेव्हा तुम्ही खूप कृतज्ञ असता. सुरुवातीला नेहमीच थोडी धाकधूक असते. आज १०० धावा करूनही, मला उद्या पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.”