
भारताचा अंडर 19 संघ सध्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसऱ्या यूथ टेस्टमध्ये भारतीय संघाची विजय मिळवण्याची संधी थोडक्यात हुकली. अंतिम सेशनमध्ये काही विकेट झटपट गेल्याने ड्रॉ वर समाधान मानावं लागलं. शेवटच्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 335 धावांच टार्गेट होतं. कॅप्टन आयुष म्हात्रे इतका जबरदस्त खेळ दाखवेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. कर्णधार म्हणून आयुष म्हात्रेने आपल्या खेळातून इतरांसमोर उदहारण ठेवलं. पहिल्या चेंडूपासून भारताच्या युवा संघाने धावांच पाठलाग करण्याचं लक्ष्य ठेवलं.
स्टार ओपनर वैभव सूर्यवंशी शुन्यावर बाद झाला. एलेक्स ग्रीनने दुसऱ्या यूथ टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये वैभव सूर्यवंशीला आऊट केलं. त्यानंतर आयुष म्हात्रेने सूत्र स्वीकारली. आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या अंडर 19 टीम विरुद्ध दुसऱ्या यूथ टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 64 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या इनिंगमध्ये 80 चेंडूत 157.50 च्या स्ट्राइक रेटने 126 धावा केल्या.
अशी कामगिरी करणारा आयुष तिसरा फलंदाज
युथ टेस्टमध्ये वेगवान शतक झळकवणारा आयुष म्हात्रे तिसरा फलंदाज ठरला. आयुषची इनिंग 126 धावांवर संपली. तो टिकला असता तर कदाचित भारताच्या युवा संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली असती. आयुषने त्याच्या इनिंगमध्ये 13 फोर आणि सहा सिक्स मारले. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 80 धावांची खेळी केली होती.
आयुषने कोणाला मागे टाकलं?
दुसऱ्या यूथ टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये मिळून एकूण 206 धावा म्हात्रेने केल्या. न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्यूलम नंतर यूथ टेस्टमध्ये 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 200 पेक्षा जास्त धावा करणारा आयुष म्हात्रे दुसरा फलंदाज ठरला आहे. युथ टेस्टमध्ये मॅक्यूलम स्ट्राइक रेट 108.41 होता. तेच म्हात्रेचा स्ट्राइक रेट 121.17 चा होता. 2001 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युथ टेस्टमध्ये मॅक्यूलमने अशी कामगिरी केली होती.
मनोज तिवारीच्या नावे असलेला रेकॉर्ड मोडला
मॅक्यूलम त्यावेळी न्यूझीलंडच्या अंडर 19 टीमचा कॅप्टन होता. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 172 चेंडूत 186 धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 42 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या होत्या. म्हात्रेने नऊ षटकार मारुन युथ टेस्टमध्ये मनोज तिवारीच्या नावे असलेला रेकॉर्ड मोडला. चेल्समफोर्डमध्ये भारतीय संघ एकवेळ 28 व्या षटकात 217/2 अशा मजबूत स्थितीत होता. पण त्यानंतर चार विकेट अवघ्या 46 धावात गमावले. त्यामुळे 290 वर डाव घोषित करावा लागला.