
भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून ( 2 जुलै 2025 ) बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे या कसोटीत तरी त्याचं उट्टं काढून विजयी सुरूवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. तर पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या मॅचमध्येही भारताला नमवून विजयी आघआडी कायम ठेवण्यास इंग्लंडचे खेळाडू सज्ज झाले आहेत. मात्र आज दुसऱ्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच बर्मिंगहॅम शहरात एक अशी घटना घडली ज्यामुळे फक्त खेळाडूंचेच नव्हे तर क्रिकेट प्रेमींचेही टेन्शन वाढलं आहे.
कॅप्टन शुबमन गिल आणि संघातील खेळाडू एक दिवस आधी, मंगळवारी सराव करत होते, मात्र तेव्हाच त्यांना अचानक हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. कोणीही हॉटेलबाहेर जाऊ नये, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. तसेच त्यांची सुरक्षादेखील वाढवण्यात आली होती. बर्मिंगहॅममध्ये असं नेमकं काय घडलं?
टीम इंडियाला हॉटेलमध्ये केलं बंद
याचं कारण म्हणजे मंगळवारी दुपारी (स्थानिक वेळेनुसार) बर्मिंगहॅम शहरातील सेंटेनरी स्क्वेअर येथे एक संशयित पॅकेट सापडल्याची सूचना मिळाल्याने एकच गोंधळ माजला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सेंटेनरी स्केवअर आणि त्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा घेरा घातला. शहरात प्रॅक्टिस करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनाही अचानक हॉटेलमध्ये परत पाठवण्यात आलं आणि खोलीतच राहण्याच्या, हॉटेलच्या बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मंगळवारी, भारतीय खेळाडूंसाठी एक पर्यायी सराव सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये कर्णधार शुबमन गिलसह ८ खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र ते पॅकेट सापडल्याची सूचना मिळाल्यावर सर्वांना परत पाठवण्यात आलं आणि बर्मिंगहॅम सिटी सेंटर पोलिसांनी भारतीय संघाला हॉटेलमध्येच राहण्याचे निर्देश दिले.
We’ve currently got a cordon in place around Centenary Square, #Birmingham city centre, while we investigate a suspicious package.
We were alerted just before 3pm, and a number of buildings have been evacuated as a precaution while it’s assessed.
Please avoid the area. pic.twitter.com/wlpKTna44w
— Birmingham City Centre Police (@BrumCityWMP) July 1, 2025
त्यानंतर बर्मिंगहॅम सिटी सेंटर पोलिसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहीली होती. ‘आम्ही बर्मिंगहॅम सिटी सेंटर मध्यभागी असलेल्या सेंटेनरी स्क्वेअरभोवती नाकाबंदी केली आहे आणि एका संशयास्पद पॅकेजची चौकशी करत आहोत. आम्हाला दुपारी 3 वाजच्याच्या सुमारास यासंबंधी माहिती मिळाली होती. खबरदारी म्हणून, याची चौकशी सुरू असताना अनेक इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कृपया या परिसरात येणं टाळा.’ असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं.
या घटनेनंतर, संघातील सदस्यांना हॉटेल सोडण्यास मनाई करण्यात आली. बीसीसीआयच्या एका सूत्रातर्फे पीटीआयला या पुष्टी दिली की बर्मिंगहॅम सिटी सेंटर पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर खेळाडूंना बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, असे त्यांनी सांगितलं. मात्र, एक तासानंतर पोलिसांनी सुरक्षा घेरा हटवला.भारतीय क्रिकेटपटू सहसा टीम हॉटेलजवळील भागात फिरतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे खेळाडूंना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीत कोणताही धोका नाही
बर्मिंगहॅम पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीत कोणताही धोका नाही, खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा दुसरा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. अन्यथा, ते पिछाडीवर जातील.