वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर होणार

| Updated on: Jul 19, 2019 | 8:34 AM

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत होत असलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता रविवारी (21 जुलै) होणार आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सहभाग आणि महेंद्रसिंग धोनीच्या भविष्यावर निर्णय होईल.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर होणार
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत होत असलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता रविवारी (21 जुलै) होणार आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सहभाग आणि महेंद्रसिंग धोनीच्या भविष्यावर निर्णय होईल.

आधी ही बैठक आजच्या दिवशी (शुक्रवारी) आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या सचिवांऐवजी प्रमुखांनी ही बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ही बैठक रविवारी घेण्यात येणार आहे. काही बदललेल्या नियमांचे पालन करण्यासाठी काही वेळही लागणार होता. तसेच समितीच्या प्रमुखांना आणि संघाच्या कर्णधाराला केव्हा उपलब्ध होणे शक्य आहे हेही पहाणे आवश्यक होते. खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतचा अहवाल देखील शनिवारी सायंकाळी येणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीचा विषय या बैठकीच्या केंद्रभागी असल्याचे बोलले जात आहे. धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल काहीही भाष्य केलेले नसले तरी तो निवृत्तीचा विचार करत असल्याची चर्चा आहे. धोनीबाबत होणारा निर्णय भविष्य काळासाठी मोठा संकेत असणार आहे. भारतीय संघ 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.

पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाचा विचार करता निवड समिती धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंतचाही विचार करु शकते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतही धोनीला वगळण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही धोनीला वगळले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विश्वचषकात पंतला शिखर धवनच्या दुखापतीनंतर बोलावण्यात आले होते.