युवा खेळाडूंना संधी देण्यासाठीच आम्हाला संघाबाहेर काढलं ना? गंभीरचं धोनीवर टीकास्त्र

| Updated on: Jul 21, 2019 | 4:41 PM

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर टीकास्त्र सोडले आहे.

युवा खेळाडूंना संधी देण्यासाठीच आम्हाला संघाबाहेर काढलं ना? गंभीरचं धोनीवर टीकास्त्र
Follow us on

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर टीकास्त्र सोडले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धोनीचा संघात समावेश होणार की नाही यावर जोरदार चर्चा सुरु होती. निवड समितीने यावर निर्णय घेण्याआधीच धोनीने आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार की निवड समिती त्याला संघाबाहेर ठेवणार या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, धोनीवरील टीका काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

महेंद्रसिंग धोनीने आपल्या निवृत्तीवर चर्चा सुरु असताना बीसीसीआयला आपण पॅरा मिलिटरी रेजिमेंटमध्ये काम करण्यासाठी खेळातून 2 महिन्यांची विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. मात्र, धोनीवर माजी क्रिकेटर्सकडून होणारी टीका सुरुच आहे. गौतम गंभीरबाबत मोठे विधान केलं. यावेळी त्याने 2012 मध्ये धोनीने ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गंभीरला एकत्र संघात न खेळवण्याचा निर्णय घेतला होता.

‘तो आमच्यासाठी मोठा धक्का होता’

गंभीर म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील मालिकेत धोनीने आम्हाला तिघांना (सचिन, सेहवाग, गंभीर) एकत्र खेळवता येणार नसल्याचे सांगितले. तसेच आपण 2015 विश्वचषकाची तयारी करत असल्याचे म्हटले. आमच्यासाठी तो मोठा धक्का होता. कोणत्याही क्रिकेटरसाठी हा मोठा धक्का ठरला असता.”

‘असं मी कधीही ऐकलेलं नव्हतं’

“एखाद्या खेळाडूला 2012 मध्येच तु 2015 च्या विश्वचषकाचा भाग नाहीस असे सांगितल्याचे मी कधीही ऐकलेलं नव्हतं. जर तुम्ही सातत्याने धावा करत राहिले तर तुमचं वय केवळ एक संख्या असते असाच विचार कायम माझ्या मनात होता. मात्र, त्यावेळी धोनीने 2015 च्या विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना खेळवण्यासाठी आम्हाला न खेळवण्याचा निर्णय घेतला. आता निवड समितीने धोनीच्या भविष्याबाबत निर्णय घ्यायला हवा”, असंही गंभीरने नमूद केलं.

गौतम गंभीरची कारकिर्द

गंभीरने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमध्ये 58 सामने खेळले. त्याने 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. यात त्याच्या 9 शतकांचा समावेश आहे. गंभीरने 147 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या. यात 2011 च्या विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यातील 97 धावांच्या अविस्मरणीय खेळीचा समावेश आहे. त्याच्या या खेळीच्या मदतीनेच भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 शतकं ठोकली होती. तसेच टी-20 सामन्यांमध्येही आपली वेगळी ओळख तयार करत 37 सामन्यांमध्ये 7 अर्धशतकांच्या मदतीने 932 धावा केल्या. यात त्याची सरासरी 27.41 इतकी होती.

‘यशाचं श्रेय अथवा अपयशाची जबाबदारी एकाची नाही’

गंभीर म्हणाला, “धोनीने आपल्याला 2 विश्वचषक (2007 आणि 2011) जिंकून दिलं हे खरं आहे. मात्र, खेळातील यशाचं सर्व श्रेय कर्णधाराला देणं किंवा अपयशाला जबाबदार धरत त्याला गुन्हेगार ठरवणं चुकीचं आहे. धोनीने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक जिंकून दिले, मात्र इतरही कर्णधारांनी भारताच्या संघाला पुढे नेले आहे. अनिल कुंबले आणि राहुल द्रविडनेही हे काम केलं आहे.”