IPL 2020 Final MI vs DC : मुंबईच्या शिलेदारांचं पारडं जड, पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी

| Updated on: Nov 09, 2020 | 5:45 PM

आयपीएलच्या अंतिम सामन्यात फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर मुंबईचे शिलेदार दिल्लीवर भारी पडण्याची शक्यता आहे.

IPL 2020 Final MI vs DC : मुंबईच्या शिलेदारांचं पारडं जड, पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी
Follow us on

दुबई : युएईमध्ये (UAE) सुरु असलेली इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) स्पर्धा उद्या संपणार आहे. गतविजेता मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन ठरेल अथवा पहिल्यांदाच अंतिम सामन्यात (IPL 2020 Final) पोहोचलेला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ चषक उंचावेल. परंतु आतापर्यंतची आकडेवारी आणि दोन्ही संघांची कामगिरी पाहिल्यास मुंबईचं पारडं दिल्लीपेक्षा जड आहे, असंच दिसतंय.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत चारवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी उद्याच्या सामन्यात दोन्ही आघाड्यांवर मुंबईचे शिलेदार दिल्लीवर भारी पडण्याची शक्यता आहे. मुंबईला यंदा फायनलपर्यंत पोहोचवण्यात मुंबईच्या गोलंदाजांचं मोठं योगदान आहे. मुंबईची बुमराह आणि बोल्ट ही जोडी भल्या-भल्या संघांवर भारी पडल्याचे यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले. या दोन गोलंदाजांनी 14 सामन्यांमध्ये तब्बल 49 फलंदाजांची शिकार केली आहे. तसेच फिरकीमध्ये मुंबईच्या राहूल चाहरने चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला दिल्लीची गोलंदाजी प्रामुख्याने एकट्या कगिसो रबाडावर अवलंबून आहे. त्याला काही प्रमाणात Anrich Nortje ची साथ मिळाली आहे. या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या कोणत्याही गोलंदाजांला मोठी कामगिरी करता आलेली नाही.

मुंबईची फलंदाजी संघाची दुसरी मोठी ताकद आहे. मुंबईच्या सलामीवीरांनी (क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा) संघाला अनेकदा चांगली सुरुवात करुन दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यंदा त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. परंतु त्याची कसर इतर फलंदाजांनी भरुन काढली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत ईशान किशननेदेखील सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. तर दिल्लीची फलंदाजी प्रामुख्याने सलामीवीर शिखर धवनवर अवलंबून आहे.

एखाद्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर अपयशी ठरले तरी त्यानंतर डाव सावरण्यासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव नेहमीच सज्ज असतो. सूर्यकुमारने यंदा त्याच्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तर ईशान किशनने मधल्या फळीत फलंदाजी करताना संघासाठी मोठं योगदान दिलं आहे. दिल्लीची मधळी फळी अजूनही चाचपडताना दिसत आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने सुरुवातीला काही सामन्यात चांगली फलंदाजी केली परंतु त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतला अद्याप सूर गवसलेला नाही. 16 सामन्यांमध्ये 38 ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी

मुंबईच्या संघाने पहिल्या 15 षटकांमध्ये कशीही फलंदाजी केली तर शेवटच्या चार ते पाच षटकांमध्ये मुंबईचा संघा 12 पेक्षाही अधिकच्या रनरेटने धावा जमवतो. हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड या दोन्ही फलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये 190 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने प्रतिस्पर्धी संघांची गोलंदाजी फोडून काढली आहे. त्यामुळे मुंबईची सुरुवात हळू झाली तरी शेवटी मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता या संघात आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 : हैदराबादच्या ताफ्यातील नव्या यॉर्कर किंगचा उदय, थंगारासू नटराजनने ट्रेन्ट बोल्ट, जेसन होल्डरला पछाडलं

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोल?

(IPL 2020 final : Mumbai Indians has more chances to defeat Delhi capitals)